Tuesday, 5 December 2017

थोडं सांगायचंय तुला...

कुणासाठी न थांबणारा मी आज तुझी वाट पाहतोय
संभ्रमात आहेस तू आणि मी उगाच अडकतोय
चीड, ओरड, त्रागा कर फक्त ते मौन सोड
तहानलोय तुझ्या आवजासाठी, दोन शब्दच मागतोय गोड
चूक नसता माफी मागतोय, तुला समजत का नाही?
शब्दात मी अडकलोय, तू बोलत का नाहीस?

थोडं बोलायचंय तुझ्याशी, तुलाही माहीती असलेलं
असं अचानक घडलेलं, तुला सांगायचं राहिलेलं
तुझा विश्वास बघ न किती, तुटतच नाही
सगळं मला कळतंय, फक्त वळतच नाही
वेळ फुकट जातोय, तू पाहत का नाहीस?
मनात काय चाललंय सांगत का नाहीस?

तुझ्याबद्दल ओढ नसली तरी भेटीची आस आहेच
माझी प्रीती क्षणिक, तरी तुझं प्रेम आहेच
माझ्या स्मृती हरवल्या, तरी तुझ्या तेवत आहेत
रसिक मनाच्या गोष्टी माझ्या तुला ठाऊक आहेत
कौतुक केलं तुझं तरी खुलत का नाही?
किती फसवलं स्वतःलाच, तू हसत का नाहीस?

-मृगा वर्तक

Thursday, 16 November 2017

Hod ची केबिन, तिथल्या खिडकीतला कोपरा



कॉलेज चा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आमची गाठ पडली. पाहता क्षणीच आवडला मला तो! पहिल्याच भेटीत झालेलं पहिलंच प्रेम! अगदीच अवघडून गेला होता. बहुदा बऱ्याच दिवसात कुणी पाहिलं नसावं त्याच्याकडे. अगदीच दुर्लक्षित वाटला मला. वाट बघत होता...कुणाची? त्याचं त्यालाही माहीत नसावं. बहुश्रुत होता, ज्ञानी तर असायलाच हवा. थोरा मोठ्यांचा सहवास जो लाभत होता त्याला.
मी अगदीच घामेजले होते..दगदगीने थकले होते. एवढ्या गोंगाटातही त्यानं खुणावलं मला. अशी फुंकर घातली की सारे च्या सारे स्वेदबिंदू कुठल्या कुठे पळून गेले. न बोलता बरंच काही सांगत होता. अगदी पटकन सूत जमलं आमचं. "थोडा मळलोय मी..थोडीशी धूळ साचलीये, जरा सहन कर हं!" इति तो. त्याच्या त्या आर्जवानेच जीवाचं पाणी पाणी होत होतं. बाहेरच्या सळाळत्या झाडांच्या गप्पा सांगत होता..जवळच लटकलेल्या मधमाशांच्या पोळ्याबद्दल बोलत होता.. मी विचारलं त्रास नाही होत तुला? तर म्हणे त्रास करवून घेतला तर सुखाचाही त्रास होतो. हे तर साक्षात सौंदर्य आहे. सहजा सहजी कुणाच्या वाट्याला न येणारं! त्याचं तत्वज्ञान ऐकत राहावंसं वाटतं. माणसांचे विचित्र स्वभाव त्याच्या दृष्टिकोनातून पाहताना चांगलेच वाटतात. विषारी विचारांना अमृताची ओळख करून देणारा देव वाटला तो मला माझा. म्हणूनच कदाचित तिथली माणसं सुद्धा ताजीतवानी वाटतात..नेहमीच..अगदी दिवसभराचे सारे शारीरिक मानसिक ताण सहन करून सुद्धा!
त्याच्या सानिध्यात असलं की दोन वेगळ्या भूमिका दाखवतो तो. एक बाहेरचं अनुभव देणारं एकलकोंड स्वतःच्या मस्तीत रमणारं जग आणि दुसरं बसल्या जागी ज्ञान अपलोड आणि डाउनलोड करणारी न्यारी माणसं. अगदी खरं सांगायचं तर दोन्ही आवडतात मला. अन त्याहीपेक्षा जास्त तो आवडतो मला.
बरं! बराच मोठा विरह आहे हा..केव्हा संपेल याची वाट पाहते आहे..पुढच्या भेटीकडे डोळे लागलेत. त्याचीच.. आमच्या एच.ओ.डी ची केबिन, तिथल्या खिडकीतला कोपरा..

Tuesday, 7 November 2017

पोकळी

लूट झाली होती एकदा कोवळ्या मनाची
अश्रूच गेले चोरीला तिथे काय कथा भावनांची
शब्दही नव्हते कारण साथच नव्हती विचारांची
बाळ होती ती आणि भूक होती प्रेमाची

हपापलेलं मन फक्त तुमचे स्पर्श मागत होतं
कितीदा समजावलं तरी चार गोड शब्दांसाठी भांडत होतं
हव्या असलेल्या जगासाठी मग कल्पनेत रमत होतं
अपेक्षा करायच्याच नसतात, हेच जणू त्याला कळत नव्हतं

एक दिवस अचानक पुस्तकाशी दोस्ती झाली
भिरभिरणाऱ्या अक्षरांतून विचारांना स्थिरता आली
शब्दांच्या माध्यमातून दिवास्वप्न पाहू लागली
गरज नावाची गम्मत आता तिची तिलाच उमजून आली

फाटक्या भावना शब्दांनी सजवून ती तिचा तिलाच धीर देते
सुकला अश्रू शाईत भिजवून एक नवी कविता लिहिते
फेसबुकच्या जगात ब्लॉगमधनं ओरडून ती तीच घर शोधते
काळपटल्या ओठांवर, डागाळलं हसून, मूक आक्रोश करते

भरकटल्या स्वप्नांना आज दिशा मिळालीये वेगळी
घुस्मटल्या एका शोधाला वाट गावसलीये मोकळी
प्रेम दुसऱ्यांवर करण्यासाठीच असतं, गोष्टच संपली इथे सगळी
एवढीशीच होती माहितीच नव्हतं, आज प्रकाशली तिची पोकळी

मृगा वर्तक 
७.११.२०१७ 

Thursday, 26 October 2017

गुलाबकली आणि तिचे गुलाब!

तिच्या बागेतली फुलं आज मुंबईतल्या कित्येक तरुण तरुणींच्या वहीत आळसावली आहेत. पण आज तिची गुलाबाची बाग सुकली होती. त्यांना रंग देणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या तिची कळी आज कोमेजली होती. वसई किल्ल्याच्या मागच्या बाजूला घर होतं तिचं. घरासमोर तिची बाग, म्हणायला घराची अर्धी लाकडं सरणावर पोहोचली होती. एका मुसळधार पावसात सगळं गेलं होतं.. तिचं घर, आई बाबा, आणि बागेतली सगळी झाडं. नाही म्हणायला कोपऱ्यात लावलेलं गुलाबाचं एक झाड तेवढं टिकलं. मग तिने सगळी बागच गुलाबाच्या झाडांनी सजवली.
दुपारी गुलाब खुडायचे आणि रात्री मरीन ड्राईव्ह वरच्या गुलाबी प्रेम फुलवणार्या युगुलांना विकायचे. त्यातल्या त्यात टपोरा गुलाब मात्र ती रोज जपून ठेवायची. काटे न काढता. भेळवला पेंगत असायचा.. आपल्या प्रेयसीचे गाल खाण्यात आणि त्यांच्या राजसाच्या प्रेमाच्या गप्पा चघळण्यात मश्गुल असलेल्या त्या जोडप्यांना भेळ खाण्यात रस नसायचा. मग तीच जायची गुलाब सम्पल्यावर भेळ घ्यायला. तो काटेरी गुलाब त्याच्या हातात कोंबायचा अन मग तो कळवळला की त्याचा हातच तिला मिळायचा. दोघंही खुश
त्या दिवशी विपरीत घडलं. आयुष्यभर लक्षात राहील  असा दिवस... .नेहमी प्रमाणे त्याला भेळ भरवताना अचानक त्याने तिला संगीतल आज तो तिची बाग पाहायला येतोय. ती खुश. आज त्यांचे हात एकमेकांच्या हातात नव्हते. एकमेकांना आपल्या स्पर्शात साठवायला व्यस्त होते. तिचे केस त्याच्या मानेवर विसावले होते आणि त्याचे ओठ मात्र तिचे शरीर कवेत घेण्यास अधीर. मानेवरून धावणारी बोटं तिच्या टीशर्ट मध्ये सारखी रुतत होती. त्याला ती रोजच हवी होती. पोटावर गुदगुल्या केल्या की गालावरच्या खळ्या खिदळत होत्या. तिचे कानात फुलणारे गरम श्वास आणि तो जास्तच  खुळावत होता. अजून वाट पाहणं त्याला शक्यच नव्हतं. अचानक तो उठला आणि म्हणाला चल निघू. तिचा कुठे हा प्रश्न त्या लाटांच्या आवाजाने गिळून टाकला कदाचित. पहाटेस उगवलेला एकटाच शुक्र तिला काही सांगू पाहत होता. तडफडून उड्या मारणारे ते खारट थेंब तिला अडवू पाहत होते. स्त्रीटलाईट्स मधून रस्त्यावर सांडलेला पिवळा प्रकाश तिच्या अंधारलेल्या मनाला डोळस व्हायची वाट पाहत होता. त्या खवळलेल्या समुद्राचं न ऐकता ती त्याच्या पाठोपाठ निघाली.. समुद्राला पाठ करून. कदाचित कायमची?
तिच्या बागेत फिरत असताना त्यातली एक कळी त्याने खुडून तिच्या समोर धरली. त्या कळीची एक एक पाकळी उलगडताना तो एक एक वचनं तिला देत होता. अवेळी खुललेली ती कळी तिच्यासारखीच गोंधळली होती. त्याने चक्क तिला मागणी घातली होती ...लग्नासाठी!
आज त्याच्या डोळ्यांत गुलाब फुलले होते.. अन तिच्या शरीरावर काटे. आज तिला उमगला होता प्रेमाचा खरा अर्थ. त्याच्या विरहाचे सुख ती रोज दिवसा अनुभवायची पण आज तिला नव्याने कळत होतं ते विरहाचे दुःख. तिच्या लाडक्या बागेला सोडून ती कशी जाऊ शकत होती? तिचं प्रेम त्याच्यापेक्षा जास्त तिच्या बागेवर होतं हे आज तिला समजत होतं. गुलाब सारे तिच्या लग्नात सजायला आणि सजवायला आतुर होऊन बसलेले. आणि मग तो आला... तिच्या डोळ्यातला अश्रू. प्रेम इतकं महाग असतं हे आज तिला समजत होतं. दहा रुपयाला समुद्रावर प्रेम विकणं वेगळं आणि प्रेमात पडल्यावर स्वतःच मनच प्रियकराला विकण वेगळं. पण तिने निर्णय घेतला होता.
तिच्या गुलाबांसाठी. गुलाबांच्या प्रेमासाठी. प्रेमातल्या त्याच्यासाठी. त्याच्या डोळ्यातल्या विश्वासासाठी. आज जगली होती ती. सारं सारं जीवन एका दिवसात भोगली होती.

-मृगा वर्तक
27.10.2017

Wednesday, 18 October 2017

दीपावली

खविस अंधाराला नजरेने दटावत ती दारोदारी सजलीये
इटुकल्या नाकावर पिटुकला प्रकाश मिरवत खुशीने गजबजलीये
गाल फुगवून बसलीये, मोठ्ठ्याने पेटतो म्हणून कंदिलावर रुसलीये
फराळाचं आमिष दाखवून लक्ष्मीला बोलावताना
दिवाळी आज माझ्या घरी विसावलीये

रंगानी माखून, दिव्यांना खुणावताना, दारात रांगोळी रूळलीये
डोळ्यांना लुभावताना मिश्कीलपणे हसत अंगणभर पहूडलीये
नजर त्याची कैद करून तिच्या सौंदर्यात बांधताना तिच्याच हातून झरलीये
भाऊबीजेच्या निमित्ताने दादाला घरी बोलावताना
दिवाळी आज माझ्या मनात फुलली आहे

नवेकोरे कपडे घरभर मळवताना छोट्यांच्या मस्तीत रमलीये
शुभेछयाच्या  गर्दीतून, मिठाईच्या डब्यांतून, प्रीती फक्त घमघमलीये
औक्षणाच्या ताटातून, पाडव्याचं ओवाळताना, त्याच्या कपाळी हसलीये
फटाक्यांना घाबरून शब्दांचा आधार घेताना
दिवाळी आज माझ्या कवितेत दडलीये

Monday, 16 October 2017

किनाऱ्यावर रूळलेलं प्रेम

दिवस जातो निघून, रात्र वैऱ्याची भासते
किती वाट पहावी मी, तुला फिकीरच नसते

भरती ओहोटीच्या वेळा मी उगाच पाळत बसतो
तुझ्या शीतल स्पर्शासाठी तडफडून आसुसतो

फेसाळलेले तुझे तुषार, निरागस हुलकावणी देतात
कानांत गुंजणारे तुझे आवाज, सांग ना, कसले गीत गातात?

उचंबळून येणाऱ्या भावनांना तुझ्या, मी किनारा देतो
तुला टोचत राहणाऱ्या त्या कचर्यालाही आपलसं करतो

सौंदर्य खुलवताना तुझे, मनाशीच गुणगुणतो प्रेमाचे बोल
तू अवाढव्य पसरलेला समुद्र आहेस, मला मात्र दगडाचेच मोल

-मृगा वर्तक
05.09.2017

Saturday, 14 October 2017

गोष्टीतली रात्र आणि रात्रीतली गोष्ट

ती रात्र अनोखे इशारे देत होती
त्या लाटांमध्ये नवी गोष्ट उसळत होती

तो समुद्र नीरस भासत होता
त्याच प्रेम दगडांमध्ये लपवत होता

पाणी तर बिलकुल रंगत नव्हतं
कदाचित त्याच सौंदर्य माझ्या मनात विरघळत होतं

आकाशातले तारे उगीच लाजत होते
आमच्या गप्पांमध्ये सतत लुडबुडत होते

नाही म्हणायला तो मुग्धावला होता
सारा आसमंत त्याच्या डोळ्यांत मावला होता

हव्याहव्याशा गप्पा त्या रात्रीत रिझवताना
मला तो क्षण अजून जगायचा होता

-मृगा
१२.१०.२०१७ 

Saturday, 30 September 2017

मनातलं मळभ


दुश्मन असला तरी रावण,
माणूस म्हणून चांगला होता
निरागस गर्भार पत्नीला बेघर करणाऱ्या
रामाला राज्य चालवण्याचा अधिकार नव्हता
ऋतुप्राप्तीच्या वेळी
तिला करता मंदिरात प्रवेश बंद
असला कसला तुमच्या
माजुरड्या देवाला सोवळ्याचा छंद?
भिकार्याच्या भाळावर मारताच ना
आळशीपणाचा शेरा?
मग त्या फूकट्याच्या दानपेटीवर
का कुलूपाचा पहारा?
'
-मृगा वर्तक
30.09.2017

Friday, 22 September 2017

खोडरबर

विचार गोंधळलेले आहेत
दुनिया मागासलेली आहे
जाती-पातीच्या गोष्टी आता
माणुसकी जाळत आहेत

कुटुंबातले वाद आता
शहरभर पसरलेत
आपल्याच माणसांचे चेहेरे
अनोळखी भासू लागलेत

प्रतिज्ञेतला भाऊ आता
पुस्तकातच राहिलाय
जगभर माणूस जोडताना
शेजारचा परका झालाय

माणसांचं मन आता
इतकं छोटं झालेय
हक्काने रागावणं कोसो दूर
मैत्रीतला वाद न्यायालयात पोहोचलाय

जात धर्म काही नको
मला माणूस म्हणून हवा आहे
नकोसे हे वाद मिटवायला
मला खोडरबर हवा आहे

-मृगा वर्तक
23.09.2017

Wednesday, 20 September 2017

त्याची गोष्ट

ढगांचं हे हळवंपण
पाऊस मनात जपत असतो
चाबूक ओढणाऱ्या विजेला
सतत दरडावत असतो

सूर गवसल्या नव्या प्रेमात
शृंगार हा फुलवत असतो
मनामनांच्या गुजगोष्टी
शब्दांमध्ये भिजवत असतो

अंधार भरल्या आभाळात
उगाच झाकोळत असतो
मन माझं मोहरताना
पाऊस नुसताच खुळावत असतो

गर्द, घनदाट जंगलामध्ये
कधी एकांत शोधत असतो
दूर आत समुद्रात
एकटाच जाऊन रडत असतो

रित्या होणाऱ्या आभाळाला
हाच मोकळं करत असतो
ढगांचं हे हळवंपण
पाऊस मनात जपत असतो

-मृगा वर्तक
20.09.2017

Sunday, 10 September 2017

....गोष्ट एका अशक्य मीलनाची

या जगात जितकं काही आहे नं त्या सगळ्याला तुझी गरज असते अरे! सूर्याची. तुझ्या प्रकाशाची. तुझ्या प्रेमाची. तुझ्या उबेची. पहाट कधी होते आणि डोंगरांच्या दुलईतून तू कधी डोकं वर काढतोस, याची वाटच पाहत असतात सारे. माझ्याचकडे बघ, रात्रभर अगदी मिटून भुतासारखा एकटाच जमिनीत पाय रोवून अंधारात तुझ्या येण्याची वाट पाहत असतो! तू नसताना तो चांदोबा किती सतावतो मला. तेही उगीच! रोज नव्या नव्या रुपात मला भेटायला येतो. कधीकधी तर येतच नाही. न सांगता गुडूप! तुझं तसं नाही. रोज भेटतोस न चुकता. तुझी चाहूल लागली कि सगळे आपली पानं सळसळवून तुझ्या येण्याची वेळ सांगतात. मला बाई बिल्कुल आवडत नाहीत ती. सगळीच आपली हिरवी. माझ्याकडे बघ फुलं आहेत..लाजरी आणि गुलाबी. तू आलास कि मगच हसतात. फूलतात. खुलतात. तोचणाऱ्या काट्याना लपवून तुझं लक्ष वेधायचा प्रयत्न करतात. काटे नको म्हणूयात. खरंतर तुझ्या आठवणीने मोहरून गेलेलं निरागस शरीर आहे ते माझं.

हे माझ्या समोर आहे ना, ते मिठागरातलं पाणी. तुझ्या भेटीसाठी कसलं उतावळं होतं ते! तुला पाहताच चांदीसारखं चमचमू लागतं. आणि वर्षानुवर्षे समुद्रात मिठाची साथ न सोडणारं ते तुला पाहून तुझ्याकडेच उडून येतं. त्या स्फटिकासारख्या सुंदर शुभ्र मिठाला एकटं करून! तुझी उबदार किरणं मला त्यांच्या कुशीत घेतात नं, तेव्हा मी कुणाचा कुणी राहत नाही. फक्त त्यांच्याशी खेळावं वाटत. नूस्त बोलत बसावं वाटत. रात्रभर शहारलेलं मन तुझ्या उबदार स्पर्शात कसं अलगद विरघळून जातं. 

मग चिडतोस तू! खूप तापू लागतोस. अगदी प्रखर. आग ओकत पळतोस. तुझ्या सोबत निळ्या आकाशावर आलेली लाजेची लाली कशी पळून जाते घाबरून. मी तरी काय करू रे? नाही मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही तू माझ्याजवळ. जळून राख होईन ना मी!  मलाही माहितीये, उगीच रोजच्या रोज घिरट्या घालतोस. माझ्याभोवती. जगाभोवती. वियोगाने तडफडतोस… कबूल आहे. पण दोघांचेही मार्ग वेगळे …आपलीच वाट चालायला हवी. शेवटी कळतं तुला. पटतं. रोज तिच्या घरासमोरून, ती दिसेल ही आशा मनात ठेऊन न चुकता जाणाऱ्या प्रेमवीरासारखा आहेस तू! तिच्या नुसत्या आवजानेही तो खुश होतो. तसा तू! संध्याकाळ झाली कि हसतोस. आणि मग ती लाली पुन्हा येते, तुझ्या गालांवर. हळूहळू शरीरभर पसरून तुला वेढून टाकते. आणि तू शांत होतोस …बुडून जातोस …त्या खवळलेल्या पाण्यात. उद्या सकाळी पुन्हा माझ्या भेटीला येण्यासाठी. मला हसवण्यासाठी. आणि पुन्हा, तुला फसवण्यासाठी. शुद्ध फसवणूकच आहे अरे ही… तुझ्या माझ्या प्रेमाची… मीलनाची…  चालायचंच.

आरसा

"खूप खूप प्रवृत्ती माणूस नावाच्या आकारात
तसा खुश होतो मी आरसा होण्याच्या प्रकारात"

लिहितोस तर छानच.....माझ्यासाठीही होशील का आरसा? चुकाही दाखवत जा अन कौतुकही करत जा

बरेच लोक येतील आदित्य तुझ्याकडे,सूर्योदय होत असताना त्याच्या सोनेरी प्रकाशाने प्रभावित झालेले..आकृष्ट होतील तुझ्याकडे..काही निस्वार्थी भावनेने काही मनात काही चांगले घेऊन तर काही स्वतःची गरज पाहून....नेहमी आरशासारखेच ट्रीट कर त्यांना! कोणाच्या हसऱ्या चेहऱ्याला भुलू नकोस....आरशा लाही फसवता येतं, विविध रंगांचे मुखवटे घालून.....आरशासमोर प्रत्येक माणूस छानच दिसायचा प्रयत्न करतो....आरसास गर्व नसावा कि प्रत्येकाचे गन निर्गुण आपण जशेच्या तसे ओळखतो....
अगदी फारच कमी माणसं स्वतः ला जाणून घेण्यासाठी आरशा समोर येतात, बाकीच्यांना फक्त स्वतः ला पटवून द्यायचं असतं कि ते खरच छान दिस्तायत

बघ तुझी कविता वाचून मलाही काही लिहावसं वाटलं, आणि म्हणूनच ही. बाकी concept च वा विषयाचं सारं श्रेय तुलाच..

काहीही झालं तरी तोच लागतो मला
तोच करतो मला शांत
तोच मला हसवू शकतो
तोच मला खुलवू शकतो

कधी कधी मात्र मी त्याच्याशी खोटं बोलते
दुःखी असेल तरी उगीच हसून दाखवते
डोळ्यांतले अश्रूही त्याच्यापासून लपवते
खोटे मुखवटे घालून त्यालाच मी फसवते

मी हसले की तोही हसतो

मी रुसले की तो रडतो

अंधारात मात्र माझी साथ सोडतो
मला काही म्हणून सांगत नाही
कितीही सुंदर दिसले तरी
कौतुक म्हणून कधी करत नाही

थोडंस त्याच्याही बाजूने.......

लहानपणापासून पाहत आलोय तिला
नवीन ड्रेस घातला कि नेहमी येऊन दाखवायची मला

कधी नाकावरचा राग
तर कधी गोड गुलाबी गलांवरची खळी
सगळं पाहिलेय मी
खूपच सुंदर दिसते ती,जशी गुलाबाची कळी

तिला स्वतःच्या प्रेमात पडताना मी पाहिलंय
तरुण होताना,स्वतःकडे तासन् तास पाहत राहताना मी बघितलंय

कुठेही बाहेर जाताना माझा निरोप घेतेच
कचकन डोळा मारून,मला पाहून हसतेच
कशी दिसतेय मी, हे पुन्हा पुन्हा विचारतेच

मलाच भीती वाटते कधी माझीच नजर लागेल
एखादा राजकुमार येईल अन ती माझाच निरोप मागेल

मी म्हणजे काय हो? अस्तित्वच नाही मला
आरसा म्हणून भिंतीवर लटकायचं
आणि तिचंच प्रतिबिंब दाखवायचं तिला

मैत्री

खरंतर मीच आभार मानायला हवेत तुझे. मी आजपर्यंत कधी paragraph लिहिला नव्हता..लिहिलेच कधी तर कविता! तुझ्या आर्शवर जे काही लिहिला ना,ते तुला आवडलं आणि म्हणूनच कदाचित मलाही आवडलं
मैत्री तर होणारच होती अरे! एकदाच भेट्लोय आपण आणि एकाच दिवस बोललोय आणि तू म्हणालास एका नव्या मैत्रीची चाहुल लागलीये तर एक गोष्ट तुझ्याकडून शिकले मी, कि मैत्री कधी निरखून पारखून करायची नसते...समोरच्याचे गूण आणि माझा स्वभाव नेहमी तराजूत टोलत आले आजपर्यंत आणि त्यात अनेक मौल्यवान रत्न गमावली अरे.
आणि माफी कसली मागतोस,मला खरच समजत नाहीये कोणत्या चुकीची माफी मागतोय्स...तुला सांगू? चूका करायच्या. बिनधास्त. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना आपण चूक करतोय तोपर्यंत ती चूक नसतेच मुळी! आपण आपल्या बाजूने अगदी खरं राहायचं...
आणखी एक गोष्ट..स्वतःला कधी कशाची भुरळ पडू देऊ नकोस...कुरळांमध्ये अडकायला होतं.... मीही अडकते. आणि अडकलो कि आपण थांबतो. तुला पुढे जायचंय आदित्य! इतक्या पुढे कि जिथे तुला खुप काही मिळेल. मान. सन्मान. पत. प्रतिष्ठा. तेव्हा तू आज सापडलेल्या कवितेकडे पाहून समाधानी होऊ नकोस....
जेव्हा तू म्हणालास तू गात नाहीस,तेव्हा मला खूप वाईट वाटलं अरे. तुला माहितीये का एक गोष्ट? जो musical instruments प्ले करू शकतो ना तो खूप चांगला गायक होऊ शकतो! ताल आणि सुरांचा राजा आहेस तू...मग स्वरांची काय बिशाद तुला सोडून जायची! आणि खरच छान गातोस तू...विश्वास ठेव आगर नको ठेउ पण खरच गोड आहे तुझा आवाज! फक्त खूप हळू आवाजात गातोस...स्वतः वर विश्वास असेल ना तर माणूस काहीही करू शकतो. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. दाद हि मोकळ्या शब्दातच द्यायची असते, आणि जेव्हा समोरच्याच्या कलेचा अविष्कार आपल्याला भुरळ घालतो ना, तेव्हा शब्द ओठांतून आपोआप उमटतात.
तुला खूप मोठं झालेलं पहायचय मला..खूप पुढे गेलेलं पाहायचंय.

अनोखी


खूप moody आहे अरे ती, धुमकेतूसारखी मधूनच उगवते! तिच्यामुळे बरीच माणसं जोडली गेली..अन ती सुद्धा बरंच काही शिकवून गेली.
इतकं सगळं माझ्यासोबत होऊन सुद्धा ती माझी कधीच नसते. मी फक्त तिची या जगाशी ओळख करून देते. आणि मग तुमच्याच स्वाधीन असते ती! तुम्हीच तिला प्रेम देता..तुम्हिच समजून घेता.. तुम्हीच काळजी करता ..आणि तुम्हीच किंमत करता! तुमच्या शिवाय तिच्या जगण्याला काही अर्थ नाही. तुमचं दुर्लक्ष झालं कि कोपऱ्यात जाऊन बसते. अगदी रुसून.
काळाप्रमाणे आपले विचार बदलतात, पण ती तटस्थ असते. तिच्या मतांवर ठाम! निर्णयापासून न ढळणारी. माझे हात तिला घडवू शकतात, पण तिच्या आदेशांचं पालन करण्यास ते असमर्थ आहेत.. याचच दुःख वाटतं. खूप कमी शब्दांत बरंच काही सांगून जाते. कधी हसवते. कधी रडवते. कधी कधी तर चक्क विचार करायला लावते. माझी मैत्रीण नाहीये, माझ्यात कधीच गुंतली नाही ती! तुमच्याकडे यायची ओढ होती तिला. नेहमीच. तिची जडण घडण झाली ती साऱ्या माझ्या शब्दांनी. पण तुमच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी आसुसलेली असते. तुमच्यासाठी जगत असते. तुम्हाला हसवण्यासाठी झुरत असते. विचार स्पष्ट, बोलणं शुद्ध, आणि तुमच्यावरचं प्रेमही निर्व्याज. श्रावणाच्या सरींसारखी बरसते आणि काही सेकेंदातच शांत होते. मग तीच मन निरभ्र ...आणि तुम्ही ओलेकींच होता. माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवणारी, माझं मन शब्दांत गोळा करणारी, मला न्याय मिळावा म्हणून मूकपणे ओरडून गोंधळ घालणारी.. कधीकधी मलाच निरूत्तर निशब्द करणारी..  ती....तिच्यावर खूप प्रेम आहे अरे माझं. माझ्या भावनांना मूर्त रूप देण्यासाठी जातात असते फक्त. मला एकटं करून जाते, पण माझ्याचसाठी सारं सारं करत असते.
तू लिहायची सवय लावल्यामुळे आदित्य, तिच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. म्हणून काहीशी रुसलीये. पण मला माहितीये, तुझ्या सहवासात फुलेल, तीच ..माझी कविता.

Love it or leave it
Its upto you
Selling my feelings here
Like joy, sadness & some fear
Putting it down in words
To letting you know that i care
The currency is your words
Use them wisely
Be it laughter, smiles or tears
Convey them nicely
Your compliments make me rich
Your comments give me inspiration
Your likes make me feel better
It really means a lot to me,
Your each & every letter
I'm not talking about price, value them
I'm not asking for your lies, criticize them
Not even asking to love me, but love them
if you dont wanna love them, cool, respect them
I respect your critics
& love your smiles
I feel those lovedrops
Which are rolling down your eyes
Either love it or leave it
Its upto you
I'm selling my feelings here
Buy some & have fun too

-mruga
03.08.2017

उर्वशी

प्रिय निरंजन,

हो! काचच म्हण, त्याच लायकीची आहे मी! सांभाळून नाही वापरलंस तर पुन्हा तुझ्या उपयोगाची राहत नाही. पुन्हा सावरायला आलास तरी भसकन तुलाच टोचते.. तुझ्या रक्तानेच खुश होते.. तुझ्या काळवळण्याने बरं वाटतं मला. बाकी स्वच्छ पारदर्शक आणि नितळ वगैरे सारं खोटं हं! मुखवटा आहे तो माझा.. तुला आकृष्ट करून घेण्यासाठी. वास्तव आणि आभासी दुनियेच्या गोष्टी तू तरी करू नकोस वेड्या, माझं अस्तित्व तुला किती हवंय त्यावर अवलंबून आहे ते. पूर्णपणे. सांगू मी कोण आहे? तुझी स्वप्न रेखणारी चित्रकार आहे मी!
खुलखुळणाऱ्या फाशांसारखी? नाही! खरंतर उलटणाऱ्या पत्त्याच्या डावासारखी आहे मी.आत्ता पर्यंत तुझा डाव मांडत असताना, मला दुसर्यांची खुशीही पाहायला आवडते.. मग मग खूपच शांत आणि धोकेबाज आहे मी. धूर्त तर असायलाच हवं, अमली नसेल तर तुला व्यसन कसं लागावं? तू पुन्हा पुन्हा माझ्याकडे खेचला जावास हेच हवं असतं मला! हवीहवीशी म्हणालास आणि मला खूष केलंस, वाह! तुझ्या मुठीत? छे! तुझ्यासारख्या अनेकांना मुठीत ठेवण्याचं स्वप्न आहे माझं, खूप आवडतं. पण स्वतंत्र नक्कीच नाहीये! आसक्ती ची गुलामी आहे. हरण्याची भीती असली की प्रयत्नांची गुलाम होते मी! अथक प्रयत्न.. तुझ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी. खरं सांगू कोण आहे मी? तुझा विचारी मेंदू बधिर करण्यासाठी अधीर आहे मी!
तसं फसवणूक करायला मला आवडत नाही पण खरं सांगितलं तर दूर लोटशील मला. तर्क लावूच नकोस माझ्याबाबत.. माझ्या स्वभावाचा मीच भरोसा देऊ शकत नाही. दोष नसतो अरे कुणाचाच, परिस्थिती ही दोषी नसते मुळी. तुम्हाला तरी कसं दोषी म्हणू? एका भावनाशून्य युवतीवर अंधविश्वास दाखवणारे डोळस आंधळे आहात तुम्ही! माझा प्रतिसाद चंचल आहे, तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो तो, त्याला रंगरूपाची तमा नसते. नकार मी तेव्हाच देईन जेव्हा मला पटेल कि तुमचा मला काहीही उपयोग नाही, बाकी तुमच्या भावनांशी खेळायला आवडतं मला. तसं मोकळेच आहे मी, कधीच स्वतःला बांधून घेत नाही, बंधनं मला आवडत नाहीत. आता कळलं कि परत सांगू मी कोण आहे? अजिंक्य खिलाडी आहे मी, जित्वरी आहे, कधीच न हरणारी.
गैरसमज चालतील... कारण झाकली मूठ सव्वा लाखाची! माझा खरा चेहरा समजला तर तूच दूर लोटशील रे मला. तो अपमान असेल माझा. अजून अपमान नावाच्या श्रेष्ठ गुरुशी ओळख झाली नाहीए माझी. शेवटचं सांगू कोण आहे मी? एक प्रश्नचिन्ह! फक्त प्रश्नचिन्ह, तुझ्या मनातलं, त्याच्या मनातलं आणि त्या साऱ्यांच्या ज्यांना माझ्यामध्ये रस आहे. तू माझ्यासाठी एक सोंगटी आहेस.. माझ्या तालावर नाचणारी, मला हवं तेव्हा हवं ते करणारी. आणि तुझी गरज संपली कि निमूट बाहेर जाणारी.

  सर्वस्वी नाहीं म्हणता येणार,पण सध्यातरी तुझीच                                 उर्वशी


उर्वशीचे काही फुकट सल्ले- मुलींनो खास तुमच्यासाठी..


रडू नकोस तू,आता त्यांना जाऊन रडंव

पडू नकोस मागे,तुझं व्यक्तिमत्त्व घडव

प्रेमाचं कोंदण रिकामी आहे? त्याला विचारांनी जडव

गरजा खोट्या नाहीत गं तुझ्या,त्यांना सामर्थ्याने मढव

घाबरू नकोस समाजाला,जेव्हा लाज चव्हाट्यावर येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


तुझे अधिकार तुला मिळवता यायला हवेत

तुझ्या हक्कांसाठी तुलाच वाद घालायला हवेत

खूप भांडलीस स्वतःशी,आता बोलता यायला हवे

स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून जगता यायला हवे

समजून घे स्वतःलाच जेव्हा राग उफाळून येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


तुझे प्रश्न मांडायला तू घाबरू नकोस

तुझ्या शंका विचारायला तू लाजू नकोस

तुझी कथा तुझी व्यथा तू लपवून ठेऊ नकोस

लोक काय म्हणतील म्हणून बिल्कुल डरू नकोस

उगारलेल्या नजरेवर तुझ्या दुनिया चिडीचूप होईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


सौंदर्य विकायला काढलंस तर त्यालाही भाव चढेल

पुरुषी अहंकार चाळवलास तर तोच तुझ्याशी नडेल

लायकी दाखवून दिलीस त्यांना तर तुझीच किंमत कळेल

तुझेही नखरे कमी नाहीत,म्हणे स्वाभिमान गळून पडेल

बाजार भरवलास दुःखाचा तर अश्रूही विकला जाईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


शृंगार कर स्वतःसाठीच..वाटतं ना छान दिसावंसं?

नवरा गडबडीत असेल तरी वाटतच कि आरशात पहावंसं…

कपाळीचं कुंकू पाहून,वाटतं ना डोळ्यांना हसावंसं?

आणि..कधी..सहजच,गलांवरती रुसावंसं?

नाकावरचा लटका राग दाखव जेव्हा तो घरी येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरजंच बोंबलत येईल

   -मृगा 

०२.०७.२०१७

...एका जगलेल्या दिवसाची गोष्ट

तुला माहिती तरी आहे का, आज पहिल्यांदा मला समजली..तुझ्या आयुष्याची गंमत! मला तुझी काही तत्व पटायची नाहीत, तू ज्या प्रकारे तुझ्या आयुष्याकडे पाहतोस ते मला रुचायच नाही. पण आज तुझा हात हातात घेऊन त्या लाटांचा आक्रोश ऐकताना मला समजलं, तुझी विचार करण्याची पद्धत वेगळीये. उडी मारु पहाणाऱ्या थेंबांमध्ये मला पुन्हा पुन्हा हरण्यातला बेफिकीरपणा दिसला तर तुला त्यांच्यामध्ये क्षणिक सुखाचा थेंबभर आनंद गवसला. तुझ्या विचारांच्या नजरेने आनंद शोधतोस तू! तुझ्या हातांना एक वेगळाच गंध आहे, कदाचित ओंजळीमध्ये सुख पेरत असावास तू! त्या सुखाचे फुलून आलेले अंकुर तुझ्या स्पर्शमध्ये जाणवतात. बिलकुल शांत न बसणारी तुझी बोटं तुझ्या धडपड्या विचारांची गोष्ट सांगतात. मला कवेत घेऊ पाहणाऱ्या त्या छोट्या डोळ्यांनी आज वाट लावलीये माझी. तुझ्या दाढीमिशी मध्ये लपलेल्या ओठांचा तो एक आगाऊपणा आवडलाय मला. त्या गाणं गाणाऱ्या ओठांमागचा एक नवीन मिथिल अजून नीट ओळखू येत नाहीए मला..जितकं जाणून घ्यावं तुला तितका भारी वाटतोस तू! जेवढं पकडू पाहावं तुला हातात तेवढा निसटून जातोस तू.. तुझ्या व्यक्तिमत्वाला किनाऱ्याची ओळख करून दे कधीतरी. किनारा काय करतो अरे, समुद्राच्या अवखळ लाटांची शोभा वाढवतो.. आतमध्ये अज्ञात असलेल्या लाटांची बाहेरच्या जगाशी ओळख करून देतो. समुद्राच्या पोटामधला कचरा, टोचणाऱ्या त्याला त्रास देणाऱ्या गोष्टी किनारा आपल्याजवळ घेतो, आणि त्याच अस्तित्व सांभाळत असतो. मला माहित नाही असं का वाटलं मला पण असं वाटत कि तू काहीतरी शोधतोयस, तुला नक्की काय हवय हे कळतंच नाहीए मला. तू आहे न फुलपाखरूयेस ..जिथे जिथे छान फुलं आहेत, ज्या फुलांकडे गोड मध आहे तिथे जातोस तू. मग आज या रंग नसलेल्या गंध नसलेल्या फुलाकडे का आलास? का आज अजून कुठलं फूल नव्हतं म्हणून? त्याच्या नसलेल्या उपयोगामुळे त्याच्यावर हसायला की त्यानेही फुलावं, लोकांच्या उपयोगी पडावं हे त्याला सांगायला? मला खरंच समजत नाहीए..खूप गोंधळले आहे मी. बरं, ते फुलांचं जाऊदे तुला खरंतर इतकंच सांगायचं होत की आज खूप छान वाटलं, तुझा हात हातात घेऊन समुद्र पाहताना!

खरच miss करते मी तो दिवस...
आज तुझा फोन उचलला नाही न त्याचं कारण मागत होतास.. हे घे तुझं उत्तर

माझ्या ओंजळीत सुख पेरणाऱ्या भल्या माणसा,

प्रीतीचे उगवलेले निरागस अंकुर तुझ्या भुकेची वाट पाहत आहेत..

पेनातील शाई उगाच फुकट जात असताना

बिचारा कागद तुझेच नाव चाचपडत आहे

तू तिच्या प्रेमाचे सूर आळवत असताना

इथे एक अभागी अश्रू वाळवत आहे

धुमसणारी शांतता मला समजावत असताना

ओघळणारे डोळे निशब्द आक्रोशत आहेत

विचारांचा वणवा मनात पेट घेत असताना

सुकलेले ओठ माझे मुकाट हसत आहेत

माझं वेडं मन तुझी वाट पाहत असताना

रात्रीचा दिवा आज फुकट जळत आहे

अचानक तुझ्या नावाने माझा फोन ओरडत असताना

हुकुमी मन माझं आज मला आवरत आहे..मला सावरत आहे...

Friday, 8 September 2017

पहाटेस गवसलेला तू!

कुणीतरी विचार करणारं असलं नं कि त्याने ते न सांगताच खिडकीवर टपटपणारे पावसाचे तुषार त्याचं गीत कानांत सांगू लागतात. त्या करारी सूर्याला ढगाआड लपवून मग तो सावळा मेघदूत तुझी साद माझ्यापर्यंत पोहोचवतो. तुझ्या आठवणी माझ्या मनात रंगत असताना तो फिकट इंद्रधनू उगीच आभाळात आळसावलेला असतो, त्याचे रंग माझ्या मनाला देऊन उगीच निपचित पहुडलेला असतो. हि खुणावती पहाट आणि झोपू न देणारी रात्र, खोलीच्या चार भिंतींमध्ये अडकवून ठेवते अरे मला, मला नसावी का तुझ्याकडे यायची ओढ? तो भिरभिरणारा वारा तुझ्या स्वरातील आर्तता गुणगुणत येतो, खिडकीच्या हातांवर विसवणारी झुळूक तुझ्या गुजगोष्टींनी मोहरलेली असते, तुझ्या मिठीत शिरण्यासाठीची माझी तडफड तिला पुरेपूर ठाऊक असते. कुण्या उदास दुपारी तुझ्या घरी तुझ्या उष्ण श्वासांत भिजलेली माझी नजर तुझेच स्पर्श शोधत असते अरे! तुझ्या श्वासांनी त्या काचेवर उमटवलेलं ते क्षणभराचं धुकं जितकं दाट असतं न तेवढीच घट्ट प्रीत माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. त्या मधुर आठवणींची उचंबळून येणारी उर्मी तुझ्याच स्पर्शात शांत होण्यासारखी असते.. सहन नाही होत हा विरह वेड्या आता घेऊन जा मला.. जिथे कुणाच्या नजरा तुला दूर करायला नसतील.. जिथली रात्र तुझं माझं प्रेम सजवायला व्यस्त असेल.. जिथे तुझ्यातला प्रियकर मला तुझ्या मिठीत कुस्करायला अधीर असेल तिथे.. तिथे मला घेऊन जा! जिथे तू फक्त माझाच असशील तिथे मला घेऊन जा.. .


ढगांचं हे हळवंपण

पाऊस मनात जपत असतो

चाबूक ओढणाऱ्या विजेला

सतत दरडावत असतो


सूर गवसल्या नव्या प्रेमात

शृंगार हा फुलवत असतो

मनामनांच्या गुजगोष्टी

शब्दांमध्ये भिजवत असतो


अंधार भरल्या आभाळात

उगाच झाकोळत असतो

मन माझं मोहरताना

पाऊस नुसताच खुळावत असतो


गर्द, घनदाट जंगलामध्ये

कधी एकांत शोधत असतो

दूर आत समुद्रात

एकटाच जाऊन रडत असतो


रित्या होणाऱ्या आभाळाला

हाच मोकळं करत असतो

ढगांचं हे हळवंपण

पाऊस मनात जपत असतो

Thursday, 7 September 2017

त्याच्या लटक्या रागावरचं उत्तर...

इवल्याश्या पावलांना डुगडुगणाऱ्या मानेला माझा आधार हवा आहे..
जसा माझ्या भिरभीरत्या मनाला तुझ्या असण्याचा आधार आहे..

तुझ्या वाटणीची प्रीती माझ्या मनात
त्याची मात्र त्याला द्यायला हवी
तू माझा अन मी तुझिये
आपणच पेरायला हवीय त्याच्या डोळ्यांत प्रीती नवी

तुझ्या माझ्या गुजगोष्टी
त्याला साऱ्या कळायला हव्या
तुझ्या माझ्या प्रेमकहाणीच्या
होऊ दे कि ओळखी त्यालाही नव्या

तुझ्या मिठीतुन साठवलेलं प्रेम
त्याच्या स्पर्शात रितं करत असते
तू न संपणारा हक्काचा खजिना आहेस
त्याच्या मनात प्रेम पेरत असते

माझ्या साऱ्या शरीराला तुझ्याच बोटांची आस असते
त्याच्या वाटणीला तेवढी स्तनाग्रच फक्त
तेही फक्त त्याला झोपवण्यासाठी
मग माझं मन तुझ्याचसाठी आसक्त

माझ्या गळ्यातल्या त्याच्या बाबाशीच खेळत असतो तो,
निमित्त मात्र मंगळसूत्राच
मानेवरून धावणाऱ्या तुझ्या गुलाबी बोटांची आठवण
मग कौतुकच वाटणार नं त्या जखमेचं

इतक्या सऱ्यांतून मला शोधलस तू..
त्याला माझ्याशिवाय पर्यायच नाहीए
काही वर्षांची जबाबदारी आहे तो
आणि तू आयुष्यभराचा साथियेस.. .

दिवस त्याच्याशी खेळण्यात जातो
रात्र सारी तुझीच आहे
त्याच मातृत्व आत्ता मिळालं
मी पहिली सोनू तुझीच आहे

Saturday, 19 August 2017

मुलांच्या बदलत्या निवडी विषयी

टीव्ही म्हणजे माझ्यासाठी नशा होती. आई रागावली,लाव टीव्ही ,मैत्रिणीशी भांडण झालं, लाव टीव्ही. कार्टून लागलेलं असायचं कोणतातरी. त्यात वेळ जायचा. हि वेळ आमच्या लहान पणीची आता ची मुलं टीव्ही बघायला करत नाहीत. बरीच कारण आहेत त्याचीही, आजच्या लेखात आपण त्या कारणांचा मागोवा घेऊया. का पाहत नसावीत मुलं टीव्ही? जाहिरातींच्या भडिमारामुळे? हातात सहज मिळालेल्या मोबाइलला फोने मुळे? कि त्यांना टीव्ही म्हणजे टोचतोच पण वाटू लागलाय/ काही नवीन हवाय का त्यांना? असे बरेच प्रश्न उपस्थित राहतात. संशोधनातून असं दिसून आलं कि ह्याच जोडीला अशीच बरीच करणे आहेत.. त्यात सगळ्यात जास्त महत्वाचं कारण म्हणजे मोबाइलला फोने. मोबाइलला फोने चा अतिवापर करू नये असं म्हणतात पण याचमुळे काही सकारात्मक बदलही झालेले आहेत. आपण बघूया ते कसे?
पूर्वीच्या काळात घरातले बहुतेक लोक एकत्र टीव्ही पाहायला बसायचे. त्यमेली माध्यम कमी असल्यामुळे निवड सुद्धा मर्यादित होती. एक बातम्यांचा चॅनेल बाबांसाठी आईआजी साठी सिरीयल आणि बॅकचेकंपनी कार्टून नेटवर्क. आणि मूळ अक्षरश प्रेमात पडली, त्या अनोख्या कार्टून्स च्या. आजही आहेत. फरक एवढाच कि मुलांना आज तुम्ही दाखवलेलं काही नकोय. त्यांना त्यांची गोष्ट स्वतः तयार करायची आहे. मोबाइलला मध्ये अनेक प्रकारच्या कार्टून्स चे गेम्स आपण पाहतो. टीव्ही ने आधीपासूनच एखाद्या कार्टून हि वैशिष्ठे मुलांच्या मनात कोरून ठेवली आहेत.. कोणत्या वेळी कोणते पात्र काय करू शकते याचा विचार मुळे करू लागली आहेत. यामुळे फायदा हा होतो कि मुलांची विचार करायची क्षमता वाढत आहे, निर्णय घेणे मुलांना जमू लागले आहे. आता मुख्य प्रश्न हा उरतो कि मुळे टीव्ही कडून मोबाइलला कडे वळली कशी? तर त्याचीही करणे बरीच आहेत. टेलिव्हिसिओन वर वाढती चॅनेल्स, आई बाबांचे मुलाला वेळ ना देणे, मुलांच्या हाताला सहज लागणारे स्मार्टफोन्स. त्यात हि मुख्यत्वे स्मार्टफोन वर मुले आपल्या हाताच्या बोटावर सारे काही मिळवू शकतात..त्यासाठी त्यांना रिमोट घेऊन बसावे लागत नाही. आणि मुळात बसावे लागत नाही.. झोपून उठून कसेही कुठेही कोणत्याहीवेळी हातात मोबाइलला फोने घेता येतो.
थोडक्यात म्हणायचं तर आपल्या तालावर जग चालायला हवा किंवा आपल्या मनासारखं व्हायला हवा हे मुलांना पटत चालले आहे, या गोष्टीची त्यांना सवय होत आहे. कुठेतरी हा बदल सकारात्मक आहे हे मेनी करायला हवं.

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...