Wednesday, 18 October 2017

दीपावली

खविस अंधाराला नजरेने दटावत ती दारोदारी सजलीये
इटुकल्या नाकावर पिटुकला प्रकाश मिरवत खुशीने गजबजलीये
गाल फुगवून बसलीये, मोठ्ठ्याने पेटतो म्हणून कंदिलावर रुसलीये
फराळाचं आमिष दाखवून लक्ष्मीला बोलावताना
दिवाळी आज माझ्या घरी विसावलीये

रंगानी माखून, दिव्यांना खुणावताना, दारात रांगोळी रूळलीये
डोळ्यांना लुभावताना मिश्कीलपणे हसत अंगणभर पहूडलीये
नजर त्याची कैद करून तिच्या सौंदर्यात बांधताना तिच्याच हातून झरलीये
भाऊबीजेच्या निमित्ताने दादाला घरी बोलावताना
दिवाळी आज माझ्या मनात फुलली आहे

नवेकोरे कपडे घरभर मळवताना छोट्यांच्या मस्तीत रमलीये
शुभेछयाच्या  गर्दीतून, मिठाईच्या डब्यांतून, प्रीती फक्त घमघमलीये
औक्षणाच्या ताटातून, पाडव्याचं ओवाळताना, त्याच्या कपाळी हसलीये
फटाक्यांना घाबरून शब्दांचा आधार घेताना
दिवाळी आज माझ्या कवितेत दडलीये

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...