Sunday, 10 September 2017

...एका जगलेल्या दिवसाची गोष्ट

तुला माहिती तरी आहे का, आज पहिल्यांदा मला समजली..तुझ्या आयुष्याची गंमत! मला तुझी काही तत्व पटायची नाहीत, तू ज्या प्रकारे तुझ्या आयुष्याकडे पाहतोस ते मला रुचायच नाही. पण आज तुझा हात हातात घेऊन त्या लाटांचा आक्रोश ऐकताना मला समजलं, तुझी विचार करण्याची पद्धत वेगळीये. उडी मारु पहाणाऱ्या थेंबांमध्ये मला पुन्हा पुन्हा हरण्यातला बेफिकीरपणा दिसला तर तुला त्यांच्यामध्ये क्षणिक सुखाचा थेंबभर आनंद गवसला. तुझ्या विचारांच्या नजरेने आनंद शोधतोस तू! तुझ्या हातांना एक वेगळाच गंध आहे, कदाचित ओंजळीमध्ये सुख पेरत असावास तू! त्या सुखाचे फुलून आलेले अंकुर तुझ्या स्पर्शमध्ये जाणवतात. बिलकुल शांत न बसणारी तुझी बोटं तुझ्या धडपड्या विचारांची गोष्ट सांगतात. मला कवेत घेऊ पाहणाऱ्या त्या छोट्या डोळ्यांनी आज वाट लावलीये माझी. तुझ्या दाढीमिशी मध्ये लपलेल्या ओठांचा तो एक आगाऊपणा आवडलाय मला. त्या गाणं गाणाऱ्या ओठांमागचा एक नवीन मिथिल अजून नीट ओळखू येत नाहीए मला..जितकं जाणून घ्यावं तुला तितका भारी वाटतोस तू! जेवढं पकडू पाहावं तुला हातात तेवढा निसटून जातोस तू.. तुझ्या व्यक्तिमत्वाला किनाऱ्याची ओळख करून दे कधीतरी. किनारा काय करतो अरे, समुद्राच्या अवखळ लाटांची शोभा वाढवतो.. आतमध्ये अज्ञात असलेल्या लाटांची बाहेरच्या जगाशी ओळख करून देतो. समुद्राच्या पोटामधला कचरा, टोचणाऱ्या त्याला त्रास देणाऱ्या गोष्टी किनारा आपल्याजवळ घेतो, आणि त्याच अस्तित्व सांभाळत असतो. मला माहित नाही असं का वाटलं मला पण असं वाटत कि तू काहीतरी शोधतोयस, तुला नक्की काय हवय हे कळतंच नाहीए मला. तू आहे न फुलपाखरूयेस ..जिथे जिथे छान फुलं आहेत, ज्या फुलांकडे गोड मध आहे तिथे जातोस तू. मग आज या रंग नसलेल्या गंध नसलेल्या फुलाकडे का आलास? का आज अजून कुठलं फूल नव्हतं म्हणून? त्याच्या नसलेल्या उपयोगामुळे त्याच्यावर हसायला की त्यानेही फुलावं, लोकांच्या उपयोगी पडावं हे त्याला सांगायला? मला खरंच समजत नाहीए..खूप गोंधळले आहे मी. बरं, ते फुलांचं जाऊदे तुला खरंतर इतकंच सांगायचं होत की आज खूप छान वाटलं, तुझा हात हातात घेऊन समुद्र पाहताना!

खरच miss करते मी तो दिवस...
आज तुझा फोन उचलला नाही न त्याचं कारण मागत होतास.. हे घे तुझं उत्तर

माझ्या ओंजळीत सुख पेरणाऱ्या भल्या माणसा,

प्रीतीचे उगवलेले निरागस अंकुर तुझ्या भुकेची वाट पाहत आहेत..

पेनातील शाई उगाच फुकट जात असताना

बिचारा कागद तुझेच नाव चाचपडत आहे

तू तिच्या प्रेमाचे सूर आळवत असताना

इथे एक अभागी अश्रू वाळवत आहे

धुमसणारी शांतता मला समजावत असताना

ओघळणारे डोळे निशब्द आक्रोशत आहेत

विचारांचा वणवा मनात पेट घेत असताना

सुकलेले ओठ माझे मुकाट हसत आहेत

माझं वेडं मन तुझी वाट पाहत असताना

रात्रीचा दिवा आज फुकट जळत आहे

अचानक तुझ्या नावाने माझा फोन ओरडत असताना

हुकुमी मन माझं आज मला आवरत आहे..मला सावरत आहे...

1 comment:

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...