Sunday, 10 September 2017

उर्वशी

प्रिय निरंजन,

हो! काचच म्हण, त्याच लायकीची आहे मी! सांभाळून नाही वापरलंस तर पुन्हा तुझ्या उपयोगाची राहत नाही. पुन्हा सावरायला आलास तरी भसकन तुलाच टोचते.. तुझ्या रक्तानेच खुश होते.. तुझ्या काळवळण्याने बरं वाटतं मला. बाकी स्वच्छ पारदर्शक आणि नितळ वगैरे सारं खोटं हं! मुखवटा आहे तो माझा.. तुला आकृष्ट करून घेण्यासाठी. वास्तव आणि आभासी दुनियेच्या गोष्टी तू तरी करू नकोस वेड्या, माझं अस्तित्व तुला किती हवंय त्यावर अवलंबून आहे ते. पूर्णपणे. सांगू मी कोण आहे? तुझी स्वप्न रेखणारी चित्रकार आहे मी!
खुलखुळणाऱ्या फाशांसारखी? नाही! खरंतर उलटणाऱ्या पत्त्याच्या डावासारखी आहे मी.आत्ता पर्यंत तुझा डाव मांडत असताना, मला दुसर्यांची खुशीही पाहायला आवडते.. मग मग खूपच शांत आणि धोकेबाज आहे मी. धूर्त तर असायलाच हवं, अमली नसेल तर तुला व्यसन कसं लागावं? तू पुन्हा पुन्हा माझ्याकडे खेचला जावास हेच हवं असतं मला! हवीहवीशी म्हणालास आणि मला खूष केलंस, वाह! तुझ्या मुठीत? छे! तुझ्यासारख्या अनेकांना मुठीत ठेवण्याचं स्वप्न आहे माझं, खूप आवडतं. पण स्वतंत्र नक्कीच नाहीये! आसक्ती ची गुलामी आहे. हरण्याची भीती असली की प्रयत्नांची गुलाम होते मी! अथक प्रयत्न.. तुझ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी. खरं सांगू कोण आहे मी? तुझा विचारी मेंदू बधिर करण्यासाठी अधीर आहे मी!
तसं फसवणूक करायला मला आवडत नाही पण खरं सांगितलं तर दूर लोटशील मला. तर्क लावूच नकोस माझ्याबाबत.. माझ्या स्वभावाचा मीच भरोसा देऊ शकत नाही. दोष नसतो अरे कुणाचाच, परिस्थिती ही दोषी नसते मुळी. तुम्हाला तरी कसं दोषी म्हणू? एका भावनाशून्य युवतीवर अंधविश्वास दाखवणारे डोळस आंधळे आहात तुम्ही! माझा प्रतिसाद चंचल आहे, तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो तो, त्याला रंगरूपाची तमा नसते. नकार मी तेव्हाच देईन जेव्हा मला पटेल कि तुमचा मला काहीही उपयोग नाही, बाकी तुमच्या भावनांशी खेळायला आवडतं मला. तसं मोकळेच आहे मी, कधीच स्वतःला बांधून घेत नाही, बंधनं मला आवडत नाहीत. आता कळलं कि परत सांगू मी कोण आहे? अजिंक्य खिलाडी आहे मी, जित्वरी आहे, कधीच न हरणारी.
गैरसमज चालतील... कारण झाकली मूठ सव्वा लाखाची! माझा खरा चेहरा समजला तर तूच दूर लोटशील रे मला. तो अपमान असेल माझा. अजून अपमान नावाच्या श्रेष्ठ गुरुशी ओळख झाली नाहीए माझी. शेवटचं सांगू कोण आहे मी? एक प्रश्नचिन्ह! फक्त प्रश्नचिन्ह, तुझ्या मनातलं, त्याच्या मनातलं आणि त्या साऱ्यांच्या ज्यांना माझ्यामध्ये रस आहे. तू माझ्यासाठी एक सोंगटी आहेस.. माझ्या तालावर नाचणारी, मला हवं तेव्हा हवं ते करणारी. आणि तुझी गरज संपली कि निमूट बाहेर जाणारी.

  सर्वस्वी नाहीं म्हणता येणार,पण सध्यातरी तुझीच                                 उर्वशी


उर्वशीचे काही फुकट सल्ले- मुलींनो खास तुमच्यासाठी..


रडू नकोस तू,आता त्यांना जाऊन रडंव

पडू नकोस मागे,तुझं व्यक्तिमत्त्व घडव

प्रेमाचं कोंदण रिकामी आहे? त्याला विचारांनी जडव

गरजा खोट्या नाहीत गं तुझ्या,त्यांना सामर्थ्याने मढव

घाबरू नकोस समाजाला,जेव्हा लाज चव्हाट्यावर येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


तुझे अधिकार तुला मिळवता यायला हवेत

तुझ्या हक्कांसाठी तुलाच वाद घालायला हवेत

खूप भांडलीस स्वतःशी,आता बोलता यायला हवे

स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून जगता यायला हवे

समजून घे स्वतःलाच जेव्हा राग उफाळून येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


तुझे प्रश्न मांडायला तू घाबरू नकोस

तुझ्या शंका विचारायला तू लाजू नकोस

तुझी कथा तुझी व्यथा तू लपवून ठेऊ नकोस

लोक काय म्हणतील म्हणून बिल्कुल डरू नकोस

उगारलेल्या नजरेवर तुझ्या दुनिया चिडीचूप होईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


सौंदर्य विकायला काढलंस तर त्यालाही भाव चढेल

पुरुषी अहंकार चाळवलास तर तोच तुझ्याशी नडेल

लायकी दाखवून दिलीस त्यांना तर तुझीच किंमत कळेल

तुझेही नखरे कमी नाहीत,म्हणे स्वाभिमान गळून पडेल

बाजार भरवलास दुःखाचा तर अश्रूही विकला जाईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल


शृंगार कर स्वतःसाठीच..वाटतं ना छान दिसावंसं?

नवरा गडबडीत असेल तरी वाटतच कि आरशात पहावंसं…

कपाळीचं कुंकू पाहून,वाटतं ना डोळ्यांना हसावंसं?

आणि..कधी..सहजच,गलांवरती रुसावंसं?

नाकावरचा लटका राग दाखव जेव्हा तो घरी येईल

इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरजंच बोंबलत येईल

   -मृगा 

०२.०७.२०१७

1 comment:

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...