या जगात जितकं काही आहे नं त्या सगळ्याला तुझी गरज असते अरे! सूर्याची. तुझ्या प्रकाशाची. तुझ्या प्रेमाची. तुझ्या उबेची. पहाट कधी होते आणि डोंगरांच्या दुलईतून तू कधी डोकं वर काढतोस, याची वाटच पाहत असतात सारे. माझ्याचकडे बघ, रात्रभर अगदी मिटून भुतासारखा एकटाच जमिनीत पाय रोवून अंधारात तुझ्या येण्याची वाट पाहत असतो! तू नसताना तो चांदोबा किती सतावतो मला. तेही उगीच! रोज नव्या नव्या रुपात मला भेटायला येतो. कधीकधी तर येतच नाही. न सांगता गुडूप! तुझं तसं नाही. रोज भेटतोस न चुकता. तुझी चाहूल लागली कि सगळे आपली पानं सळसळवून तुझ्या येण्याची वेळ सांगतात. मला बाई बिल्कुल आवडत नाहीत ती. सगळीच आपली हिरवी. माझ्याकडे बघ फुलं आहेत..लाजरी आणि गुलाबी. तू आलास कि मगच हसतात. फूलतात. खुलतात. तोचणाऱ्या काट्याना लपवून तुझं लक्ष वेधायचा प्रयत्न करतात. काटे नको म्हणूयात. खरंतर तुझ्या आठवणीने मोहरून गेलेलं निरागस शरीर आहे ते माझं.
हे माझ्या समोर आहे ना, ते मिठागरातलं पाणी. तुझ्या भेटीसाठी कसलं उतावळं होतं ते! तुला पाहताच चांदीसारखं चमचमू लागतं. आणि वर्षानुवर्षे समुद्रात मिठाची साथ न सोडणारं ते तुला पाहून तुझ्याकडेच उडून येतं. त्या स्फटिकासारख्या सुंदर शुभ्र मिठाला एकटं करून! तुझी उबदार किरणं मला त्यांच्या कुशीत घेतात नं, तेव्हा मी कुणाचा कुणी राहत नाही. फक्त त्यांच्याशी खेळावं वाटत. नूस्त बोलत बसावं वाटत. रात्रभर शहारलेलं मन तुझ्या उबदार स्पर्शात कसं अलगद विरघळून जातं.
मग चिडतोस तू! खूप तापू लागतोस. अगदी प्रखर. आग ओकत पळतोस. तुझ्या सोबत निळ्या आकाशावर आलेली लाजेची लाली कशी पळून जाते घाबरून. मी तरी काय करू रे? नाही मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही तू माझ्याजवळ. जळून राख होईन ना मी! मलाही माहितीये, उगीच रोजच्या रोज घिरट्या घालतोस. माझ्याभोवती. जगाभोवती. वियोगाने तडफडतोस… कबूल आहे. पण दोघांचेही मार्ग वेगळे …आपलीच वाट चालायला हवी. शेवटी कळतं तुला. पटतं. रोज तिच्या घरासमोरून, ती दिसेल ही आशा मनात ठेऊन न चुकता जाणाऱ्या प्रेमवीरासारखा आहेस तू! तिच्या नुसत्या आवजानेही तो खुश होतो. तसा तू! संध्याकाळ झाली कि हसतोस. आणि मग ती लाली पुन्हा येते, तुझ्या गालांवर. हळूहळू शरीरभर पसरून तुला वेढून टाकते. आणि तू शांत होतोस …बुडून जातोस …त्या खवळलेल्या पाण्यात. उद्या सकाळी पुन्हा माझ्या भेटीला येण्यासाठी. मला हसवण्यासाठी. आणि पुन्हा, तुला फसवण्यासाठी. शुद्ध फसवणूकच आहे अरे ही… तुझ्या माझ्या प्रेमाची… मीलनाची… चालायचंच.
सुंदर! सूर्याचे प्रतिबिंब छान रेखाटले आहे
ReplyDeleteKammal
ReplyDelete