Friday, 8 September 2017

पहाटेस गवसलेला तू!

कुणीतरी विचार करणारं असलं नं कि त्याने ते न सांगताच खिडकीवर टपटपणारे पावसाचे तुषार त्याचं गीत कानांत सांगू लागतात. त्या करारी सूर्याला ढगाआड लपवून मग तो सावळा मेघदूत तुझी साद माझ्यापर्यंत पोहोचवतो. तुझ्या आठवणी माझ्या मनात रंगत असताना तो फिकट इंद्रधनू उगीच आभाळात आळसावलेला असतो, त्याचे रंग माझ्या मनाला देऊन उगीच निपचित पहुडलेला असतो. हि खुणावती पहाट आणि झोपू न देणारी रात्र, खोलीच्या चार भिंतींमध्ये अडकवून ठेवते अरे मला, मला नसावी का तुझ्याकडे यायची ओढ? तो भिरभिरणारा वारा तुझ्या स्वरातील आर्तता गुणगुणत येतो, खिडकीच्या हातांवर विसवणारी झुळूक तुझ्या गुजगोष्टींनी मोहरलेली असते, तुझ्या मिठीत शिरण्यासाठीची माझी तडफड तिला पुरेपूर ठाऊक असते. कुण्या उदास दुपारी तुझ्या घरी तुझ्या उष्ण श्वासांत भिजलेली माझी नजर तुझेच स्पर्श शोधत असते अरे! तुझ्या श्वासांनी त्या काचेवर उमटवलेलं ते क्षणभराचं धुकं जितकं दाट असतं न तेवढीच घट्ट प्रीत माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. त्या मधुर आठवणींची उचंबळून येणारी उर्मी तुझ्याच स्पर्शात शांत होण्यासारखी असते.. सहन नाही होत हा विरह वेड्या आता घेऊन जा मला.. जिथे कुणाच्या नजरा तुला दूर करायला नसतील.. जिथली रात्र तुझं माझं प्रेम सजवायला व्यस्त असेल.. जिथे तुझ्यातला प्रियकर मला तुझ्या मिठीत कुस्करायला अधीर असेल तिथे.. तिथे मला घेऊन जा! जिथे तू फक्त माझाच असशील तिथे मला घेऊन जा.. .


ढगांचं हे हळवंपण

पाऊस मनात जपत असतो

चाबूक ओढणाऱ्या विजेला

सतत दरडावत असतो


सूर गवसल्या नव्या प्रेमात

शृंगार हा फुलवत असतो

मनामनांच्या गुजगोष्टी

शब्दांमध्ये भिजवत असतो


अंधार भरल्या आभाळात

उगाच झाकोळत असतो

मन माझं मोहरताना

पाऊस नुसताच खुळावत असतो


गर्द, घनदाट जंगलामध्ये

कधी एकांत शोधत असतो

दूर आत समुद्रात

एकटाच जाऊन रडत असतो


रित्या होणाऱ्या आभाळाला

हाच मोकळं करत असतो

ढगांचं हे हळवंपण

पाऊस मनात जपत असतो

3 comments:

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...