Tuesday, 8 August 2017

माझं पाहिलं वाहिलं, आणि तेही चूकलेलं समीक्षण

त्या सगळ्यांसाठी, ज्यांना या जगातल्या दहाव्या आश्चर्याची उत्कंठा आहे. अर्थात the secret. तुम्ही जर तुमच्या विचारांवर खरंखुरं प्रेम करत असाल तर मी म्हणेन कि तुमच्या आयुष्यातले 2 दिवस तुम्ही वाया घालवू नका. ते पुस्तक वाचताना मानसिक समाधानाव्यतिरिक्त दुसरं काहीच मिळत नाही. आणि तुमचा जर खरंच इतका विश्वास आहे त्या पुस्तकावर किंवा त्यातल्या साखर लावलेल्या खोट्या शब्दांवर तर मग नोबेल मिळायला हवं होतं नाही का? जगातील साऱ्या माणसांची दुःख तुम्ही दूर करू शकता तर तुम्ही नोबेल चे हक्कदार नक्कीच आहात!

काही जुन्या लोकांचे विचार सांगून, त्यांना हे माहिती होतं पण लपवले गेले असं म्हणता...आणि तुम्ही ते जगासमोर आणलं म्हणता..तुम्हाला ते कुठं सापडलं? प्रत्येक सिद्धांताचे कारण हे असतेच...तुम्ही याचे समर्थन कसे कराल? कधीतरी युनिव्हर्स तुमच ऐकतं आणि कधीतरी नाही मग तुम्ही त्याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणू नका...आकर्षणाच्या शक्यता म्हणा! प्रत्येक गोष्टीला दोन शक्यता असतातच. .. एकतर हो किंवा नाही. आणि जर हो असेल तर ते तुमच्या युनिव्हर्स ने ऐकलं आणि नाही असेल तर त्याच्या नकारात्मक विचारांना दोष देणारा हा कुठला पळपुटा न्याय?

बरं! त्यात एक स्वप्नकथा आहे. कार पार्किंग ची! मीही करून पहिला हा प्रयोग. ट्रेन मध्ये खिडकीशी जागा मिळवण्याचा. आणि अगदी प्रत्येक वेळी तो यशस्वी हि होत गेला. एकदा काय झालं माहितीये? मी खूप जास्त विचार केला त्याच खिड्कीपाशीच्या जागेचा. आणि म्हंटलं मनात सगळ्यात शेवटी चढूयात, कारण ती जागा माझीच आहे...मलच मिळणारे. पण दुर्दैवाने त्याच दिवशी कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त विचार त्याच जागेचा केला होता!

त्यांना त्यांचे वाचक म्हणजे तोंडात भाताचा घास तसाच कोंबून एकाग्र नजरेने आईची गोष्ट ऐकणारी लहान मुलं वाटतात, कि त्यांना ते सांगतात युनिव्हर्स नावाचा एक जीनी आहे जसा अल्लादिन कडे होता...दिव्याच्या धुरातून येणारा आणि असं म्हणणारा कि तुमची इच्छा माझी आज्ञा!

तो एक नशीबवान मुलगा ज्याला सायकल हवी होती. पॉकेट मनी चे पैसे पिगी बँक मध्ये जमावण्याऐवजी, छोट मोठं काम करून गल्ला जमावण्याऐवजी किंवा सरळ आई बाबांना संगण्याऐवजी मूर्खासारखी कुठल्यातरी मासिकातली चित्र कापून भिंतीवर लावली. आणि त्याला सायकल मिळाली सुद्धा! अहो आश्चर्यम! मीही लावलेत माझ्या बालपणीचे photos भिंतीवर....आशा करते लौकरात लौकर माझं बाळपण मला परत मिळावं.

आणखी एक गोष्टय ती एका सिनेमॅटोग्राफर ची! ज्याला प्रेयसी मिळत नसते. वाह! म्हणजे तुमची प्रेयसी पण तुम्ही युनिव्हर्स कडेच मागता! आणि मग तो अनेक मुलींची नग्नचित्र काढून भिंतीवर लावतो. आणि युनिव्हर्स त्याला अनेक प्रेयस्या देतो. (प्रेयसी च अनेकवचन मराठीमध्ये काय आहे मला माहिती नाही, व्याकरणाच्या या चुकीसाठी क्षमा असावी)

आणखी एका paralysis झालेल्या माणसाबद्दल वाचलं होतं, ज्याच्या अडाणी डॉक्टरांचं आणि आळशी physiotherapist च सारं श्रेय त्याच्या मनातले बिचारे सकारात्मक विचार घेऊन गेले.

आणि हो! एक महत्त्वाचं सांगायलाच हवं. त्या पुस्तकातली पानं आणि त्याचं मूखपृष्ठ खरंच खूप चांगल्या दर्जाचं होत. खूपच.


No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...