Tuesday, 8 August 2017

पाऊस

पाऊस डोळ्यांत असतो माझ्या. अगदी रोज बरसतो. तरीही मला त्या पावसात भिजण्याचा कंटाळा येत नाही हे विशेष. रात्री झोपायला गेलं कि त्याच आभाळ गढुळतं. कडकडाट गडगडाट काहीही होत नाही. सगळं कसं अगदी श्रावणसरींसारखं, झरझर ओघळून शांत व्हायचं.
मला गरज होती अगं तुझी. अजूनही आहे. हे डोळ्यातलं पाणी तुलाच शोधतेय गं! सारख. तू हवीयेस! तुला हरवण्याची भीतीच नव्हती ना गं कधी. लहानपणापासूनच चिडायचे रागवायचे मी अन समजून घेणारी तू! ...माझी छोटी बहीण.
हा रिमझिमणारा पाऊस पहिला कि तुझी आठवण येते. आपण सायकल वरून क्लास ला जायचो. माझी बॅग तुझ्या रेनकोट मध्ये आणि मी भिजत! 15 पावसाळे एकत्र काढले आपण पण एकदाही भिजली नाहीस ना माझ्यासोबत? 10 ची परीक्षा झाल्यावर जाऊया भिजायला असं म्हणाली होतीस, अजून आठवतं मला! पण झाली तुझी परीक्षा आणि त्याच वर्षीच्या पहिल्या पावसात तुझ्या निर्जीव कलेवराकडे पाहत होते मी! तेव्हाही नाही भिजलीस हरामी. एम्ब्युलन्स मधूनच स्मशानात गेलीस. तुझ्याशिवाय नीरस वाटतोय गं हा पावसाळा. आता किळस वाटते, लहानपणी पावसात गांडूळ पकडायला जायचो आपण, माझी छत्री उलटी करून त्यात बेडुकमासे पकडायचो....आणि घरच्यांनी सांडून दिले कि रडून नुसता गोंधळ.
कोणीच नाही भिजत गं माझ्यासोबत पावसात. आज पण त्या अपुऱ्या स्वप्नांत रमते मी! जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही.
मला विचार करायला लावतो, म्हणून मला तो आवडतो.
तुझ्यासोबत केलेला नौटंकीपणा आठवायला लावतो, म्हणून मला तो आवडतो.
तुझ्या मृत्यू च्या दिवसाची आठवण करून देतो म्हणून? कदाचित हो! म्हणूनच मला तो आवडतो.
त्याच्या चवहीन जलबिंदूंमध्ये माझ्या डोळ्यातला खारट पाऊस लपला जातो म्हणून मला तो आवडतो.
हो! कितीही वाईट वागला तरी पाऊस मला आवडतो!

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...