Tuesday, 8 August 2017

फितुरी..

आजच्या जगात विश्वास कोणावरच ठेऊन चालत नाही. ज्ञानेश्वरांच्या भिंतीला पाय होते, आताच्या भिंतीला कानही असतात आणि तोंडही असतं. आजच्या सिमेंट कॉंक्रिट च्या राज्यात भिंतीच फार, त्यामुळे कुठे बोलायचीही सोय नाही. मग मला एक मैत्रीण मिळाली. मला सामावून घेणारी. समजून घेणारी. आपल्या मनात जेव्हा बरच काही खदखदत असत ना तेव्हा आपल्याला कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. तशीच होती ती. शांत. समंजस. सारं काही ऐकून घ्यायची. उगाच फुकटचे सल्ले द्यायची नाही. आणि मुख्य म्हणजे विचार करायला लावायची...उगीच फालतू विनोद नाही. 
माझं मन हलकं करणं हे एकच जणू तीच काम. कोणे एके काळी तिला पाहिलं कि अगदी भडभडून यायचं मला, मग  माझे अश्रू सारे ओघळू लागायचे तिच्या गालावर. आणि रीती होत जायचे मी ...तिच्याच कुशीत. माझे सुकलेले अश्रू तिच्या सर्वांगावर अगदी ठळकपणे उठून दिसायचे. पण ते कोणी पाहू नये याची काळजी मात्र तिने घेतली. माझ्या रागाने,संतापाने तिच्या शुभ्र अंगांगावर व्रण उठले. जखमी. पचवले तिने ते! आणि मिरवतेही त्यांना! माझं सारं शल्य ,सारी दुःख स्वतःच्या पोटात गडप करून घेतली. माझी सक्खी सखी होती ती, सक्खी मैत्रीण होती. दिवसभर माझी वाट पाहत राहायची ,आणि रात्री मग आम्ही गप्पा मारायचो. एक तास.
बरीच वर्ष झाली, माझं सीक्रेट जगासमोर येऊ दिलं नाही तिने. फक्त माझी होती ती. फक्त माझी!
आणि, अगदी अचानक, एक दिवस, फितूर झाली! मला अस्सा राग आला होतं म्हणून सांगू? पण तिचंही बरोबर, तीन वर्षात तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं मी! तिलाही शेवटी मर्यादा होत्याच. माझी काळजी हि होतीच. आणि त्यातच तिला तो भेटला! सारं काही सांगितलं तिने त्याला. अगदी जस्सच्या तसं. तपशीलवार. मग तो ऐकतो होय? माझी काळजी तो घेऊ लागला. .....अगदी तिच्यासारखी. काही बोलायचं नाही. सगळे नखरे सहन केले माझे. बिलकुल judge केलं नाही मला. 
त्यांनच मला सांगितलं , ती जेव्हा बोलू लागली, अतिशय मोकळेपणी माझे शब्द त्याच्या हळव्या मनापर्यंत पोहोचवत होती. कदाचित तिचे जखमी व्रण पुसले जायची भीती होती तिला! मला एकटं करून कशी जाऊ शकत होती ती? निस्वार्थी होती ग अगदी! सारं सारं आयुष्य माझ्यासाठी जगली...मला जगवण्यासाठी झुरली...मी झुरू नये म्हणून हसली...आणि मी हसावं म्हणून फितूर झाली..हो! म्हणूनच फितूर झाली! माझी लाडकी डायरी......

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...