तशी घाबरट नाहीये मी बिल्कुल. पण तरीही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना मला भीती वाटते. कुणाच्या तरी आधाराची गरज वाटते. डोळ्यांत स्वप्नं असतात पण त्यांना पंख नसतात. कॉलेज मध्ये यायची स्वप्न मी खुप लहानपणापासून पाहायचे, खूप अपेक्षा मनात बाळगायचे...मला असे मित्र मिळतील न माझा तसा ग्रुप होईल...उगीच..बराच काही. आज पासून माझं नवं कॉलेज सुरु होतंय. मित्र तर मिळालेत, पण ते शेवटपर्यंत टिकतील ना? कधी कधी उगाच नको त्या गोष्टीची भीती वाटते.
मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तुझ्याशी मैत्री होईल. आभाळाला लागलेलं फळ वाटायचास तू! खुपसा अबोल, शांत, गप्प गप्प... अगदी मोजकं बोलायचास. जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा वाटलं होतं तू खूप मोठा आहेस ..असामान्य ..सगळ्यांना काय काय नावं ठेवली आपण पण अजूनही आदित्य ला आदि म्हणताना भीती वाटते. आदरयुक्त भीती. तसाच आहेस तू.. तुझ्या नावसारखा. प्रभावशाली, प्रकाशमय..माझं अस्तित्वच उजळवून टाकलंयस. तुझं बोलणं मला माझ्यातल्या मीपणाची जाणीव करून देतं. माझीच स्वप्न मला नव्याने पटवून देतं.
हि सुरुवात एका नव्या मैत्रीची आहे. नव्या भावनेची आहे. आणि एका विश्वासाची. नशिबाने मिळालेलं रत्न आहेस तू. न पराखता पदरी पाडुन घेतलेलं!
होशील का माझ्या आयुष्याचा आरसा? चुका आणि कौशल्य अगदी स्पष्टपणे दाखवणारा? रंगवशील का माझी कोरी स्वप्नं तुझ्या विचारी नजरेच्या रंगांनी? माझ्या कवितेची प्रतिभा होशील?
उत्तरं नकोयत मला. मला माहिती असलेल्या उत्तरांमध्ये समाधानी आहे मी. बरं! एक सांगतेच आता ..तुझ्या गाण्याचा सूर काही छानसा लागत नाही, पण तुझ्या आवाजाचा गोडवा साऱ्या उणिवा भरून काढतो.
तुझ्या भरवशावर स्वप्नं पाहतेय ..पडले तर सावरशील?
खूप उर्मट आहे अरे मी ..चुकले तर हक्काने ओरडशील?
स्वप्नांच्या या आभासी दुनियेमध्ये कधी हरले तर हात देशील?
कधी भांडले तुझ्याशीच ....तर न रागावता माझी चूक मला समजावशील?
निखळ मैत्री कि काय म्हणतात ते आजपर्यंत अनुभवलं नाहीये मी, मैत्री करशील माझ्याशी?
म्हंटलं ते खरंय.. नवी सुरुवात करताना आपण अपेक्षाच जास्त ठेवतो!

No comments:
Post a Comment