एक चिऊ असते आणि एक असतो काऊ. चिऊला घर असतं. स्वतःचं. घर म्हणजे काय? चार भिंती? एक छप्पर? की कोंडवडा? साठलेल्या भावनांचा? की कुंपण? प्रकाशापासून, पावसापासून किंवा आनंदापासून लपून राहण्याचं? असो... जेवढे प्रश्न तेवढी उत्तरं. तर तिला घरात कामं असतात. रोजचीच. कोणासाठी करत असते ती कामं? कोण येणार असतं राहायला? कोण असतं पाहायला? आपणच ठरवून घेतलेल्या नियमात ती प्रत्येक पाहुणा मोजून घेत असते. नव्हे, खरंतर तिला वाटलेला योग्य पाहुणाच ती घरी बोलावत असते. तिला मात्र बाहेर जायला आवडत नाही. उंबरठा असतो नं तिच्या घराला. म्हणजे मर्यादा. खिडकीतून जग बघायचं. खिडकी दाखवेल तेवढंच. आपल्यावरच हसायचं नि आपल्यावरच रुसायचं.
काऊ कडे काय असतं? काहीच नाही. पण एकदा ती त्याला घरात घेतेच. पावसाळा संपताना काऊ उडून जातो. जाताना चिऊला एक बाळ देऊन जातो. काळशार गोंडस. चिऊला आता बाहेर पडायलाच लागणार असतं. कर्तव्य निभावायला हवंच. बाळाला खाऊ द्यायला हवंच ना! पण उंबरठा? ती मग काढूनच टाकते तो. आता तिचं घर सताड मोकळं. आता येउदे वारा.. बरसुदे धारा. बळाने सगळं बघायला हवं. अश्रू पाहायला हवेत, रंग निरखायला हवेत. बाळाला दुःख दिसायला हवं. नकार पचवता यायला हवेत. त्याला रडता यायला हवं. मन असल्याची जाणीव व्हायला हवी. परिस्थितीशी दोन हात करता यायला हवेत.
पण पाऊस घरटं उध्वस्त करतो. वाऱ्याने पिल्लू पळवलं असतं. भिंतीतलं घरपण झाडभर विखुरलं असतं. उंबरठा काढून टाकायचा नसतो, तो ओलांडण्यासाठी असतो. येणाऱ्याचं स्वागत करतो.. जाणाऱ्याला निरोप देतो. शेवटी मर्यादाच ती! धाक.
आज चिऊ कबुच्या घरात जाते .. रात्र घालवायला .. एक अजून घर उध्वस्त करायला.
गोष्ट चिऊची नव्हतीच मुळी. काऊची होती.
कळलं का? आज चिऊचा काऊ झालेला असतो!
आणि कबूची चिऊ!
Mruga
No comments:
Post a Comment