मी आता 25 वर्षांची होईन तरी माझी आई मला अधून मधून छोट्या मुलांसारख्या गोष्टी सांगत असते.
आज गुरुपौर्णिमेबद्दल संत नामदेवांची सांगितलेली गोष्ट..
एकदिवस एका नदीतीरी सगळे संत जमले असतात. त्यात नामदेव सुद्धा असतात. संत नामदेवांना गुरू नसतो. आणि त्याचं कारण असं की नामदेवांना थेट देवाशी संवाद साधता येत असतो. चक्क देव ज्याच्याशी बोलतो त्याला आणखी गुरुची गरजच काय? तर त्या नदीकिनारी झालेल्या संमेलनात नामदेवांचा अहं कसा घालवता येईल याची योजना आकार घेऊ लागते. मुक्ताई गोरा कुंभाराकडे त्याचा लोटा मागते आणि प्रत्येकाच्या डोक्यावर वार करते. कोणीही काहीही प्रतिक्रिया देत नाहीत पण नामदेव मात्र चिडतात. तेव्हा ती म्हणते हे भांडं जरा कच्च आहे. आणि सगळे मिळून नामदेवांना गुरूच्या शोधात पिटाळतात.
संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातल्यावर सरतेशेवटी संत नामदेव औंढा नागनाथ येथे येतात. तिथल्या एक शंकराच्या मंदिरात विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपी गेले असतात. कोण्या एक क्षुल्लक माणसाला अशा अवस्थेत पाहून नामदेवांचा संताप अनावर होतो. तेव्हा विसोबा म्हणतात तुला त्रास होतोय तर तू माझा पाय उचल आणि दुसऱ्या ठिकाणी ठेव. आणि नामदेव जेवढ्या ठिकाणी पाय उचलून ठेवतात तेवढ्या शंकराच्या पिंडया उगवतात. म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, आणि नामदेवांना साक्षात्कार होतो. आपण ज्याच्याशी बोलतो तोच फक्त देव नाही तर देव चराचरात आहे. हेच नामदेव पुढे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे निघून जातात. आणि विठ्ठल आणि कृष्ण कसा एकच आहे हे पटवून देण्याचे काम करतात.
कथेचा उद्देश इतकाच की कुणीतरी गुरू असावा, जो मार्ग दाखवेल, चुका दाखवून देईल, चुका सुधारण्यास संधी देईल, जगण्याला कारण देईल. शंकराच्या पिंडीसारखाच गुरू सुद्धा तुम्ही प्रत्येक माणसात, प्रत्येक निर्जीव वस्तूत पाहू शकता. फक्त इतकंच की शिकून घेण्याची तयारी असायला हवी. एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहता यायला हवं. कोणत्याही गोष्टीवर चटकन प्रतिक्रिया न देता विचार करता यायला हवा. माणूस, त्याचा इतिहास, त्याच्या 'तसं' वागण्यामागची कारणं समजून घेता यायला हवीत. या इतक्या शक्ती जोपर्यत वश होत नाहीत तोपर्यंत एक गुरू पुरेसा आहे. तुमचा सर्वाधिक विश्वास ज्या गोष्टीवर आहे, जिला तुम्ही मित्र बनवू इच्छिता अश्या व्यक्तीला/गोष्टीला खुशाल गुरुत्व बहाल करा. की विश्वाशी मैत्री होईल आणि या विश्वाला जाणून घेतल्याने तुमचं अस्तित्व तुमच्या नजरेत ठळक होईल.
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गुरू सापडावा अशी कामना करते. 
No comments:
Post a Comment