मुंबई विद्यापीठातून communication and journalism विषयात पदवी संपादन करत होते त्यावेळची गोष्ट आहे. Documentary film making असा एक विषय होता त्यासाठी डॉक्युमेंटरी चित्रित करण्यासाठी म्हणून हिंगोली ला गेलो होतो. या भागात आमचाच एक वर्गमित्र गयानाथ सूर्यतळ याचं गाव आहे, सेंदूरसना. त्याच्या गावातल्या शाळेत मुक्काम करायचा होता आणि त्यांच्याच गावातल्या जीवनावर आधारित छोटे छोटे विषय घेऊन माहितीपट बनवायचे होते. विषय तयार करणं, महितीपटाची मांडणी करणं त्यानंतर चित्रीकरण आणि मुख्य म्हणजे हे सगळं आपल्या ग्रुप मेंबर्स शी विचार विनिमय करून. आणि फक्त 3 दिवस. रेकीसाठी, पाहणीसाठी वेळच नव्हता.
गावात प्रवेश केल्या केल्या काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या अशा की, सेंदूरसनाचा माणूस मुखदुर्बळ आहे. भाषा एकच, मग? कदाचित शहरी आणि ग्रामीण जीवनशैली चा फरक हे त्याच्या न्यूनगंडाचं कारण असावं का? गावानं हसून स्वागत केलं, पण त्यांच्या चेहेऱ्यावर व्यथाच हसत होत्या. मला कळतच नव्हतं, प्रश्न विचारल्यावर त्यांच्या हालचालीत दिसणारा थंडपणा, 'गरीबाच्या चेष्टा करता का म्याडम?' असं म्हणताना ते चेहेऱ्यावरचं अगतिकतेचं हास्य गोष्ट सुचू लागायला पुरेसं होतं. डोळ्यात स्वप्न विझलेली पण कुतूहल मात्र होतं. त्यांचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता. गेल्या गेल्या अगदी लहान मुलांपासून ते मध्यमवयीन पुरुषांपर्यंत सगळ्यांनीच माझ्याभोवती गराडा घातला. माझ्या धर्माची आणि पेहेरावाच्या पद्धतीची चौकशी झाली आणि त्याबद्दल थोडी नाराजीही व्यक्त झाली. पुरुषाला लाजुन चूरर होताना मी इथे प्रथम पाहिलं, पंचवीशीतल्या माझ्याइतक्या मुलांना त्यांची स्वतःची 2 पोरं असतात. इथली घरं वाडासंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. परंतु घरांवर कौलं किंवा पत्रे नाहीत, पर्जन्यछायेखालचा प्रदेश असल्याने त्याची गरजही भासत नाही तर नुसतंच छप्पर आहे. बऱ्याचशा गोष्टी जगापेक्षा वेगळ्या करायची संस्कृती गावाने जपून ठेवली आहे. परंतु त्याची कारणं आणि त्यांच्या गरजा ते सांगू शकत नाहीत.
एका बाजूला टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला तलाव आणि त्यातून जाणारा रस्ता, त्या रस्त्यालगत गाव वसलेलं आहे. म्हणजे माझी पर्वणीच होती. सकाळ-संध्याकाळ माझी भटकंती चालत असे. दुपारचं काही वेळ काम होई तेवढंच. माझा मुळात स्वभाव माणूस जाणून घेण्याचा असला तरी इथे मला त्यांची गरिबी, त्यांचे प्रश्न, त्यामागची कारणं, त्यांची अगतिकता आणि कष्ट काहीकाही दिसत नव्हतं, मला जगून घ्यायचं होत6 ते गाव, साठवून ठेवायचं होतं सगळंच, डोळ्यात मनात वहीत.. ते भर पावसाळ्यातलं रखरखीत सौंदर्य, भटकायचं होतं मनमुराद, दुर्गेचं मंदिर, गढीचे अवशेष, खानबाबाचा दगड, शेतं, बांध, तलाव. तलाव! तसं त्या 4 दिवसाच्या वास्तव्यात तलावात मी रोज डुंबले पण त्या एका संध्याकाळी मी माझा एक मित्र आणि गावतलेच 2 छोटे पंटर तलावावर गेलो होतो. त्यावेळी आलेला पाऊस, वारा, विजा, धड हसताही येत नव्हतं, माझ्यापासून फूटभर अंतरावर असलेल्या मित्राशी बोलताही येत नव्हतं. ती वेळ पुन्हा कधी येऊ नये आणि त्या स्मृती पुसल्याही जाऊ नयेत. आयुष्यात एकदातरी घ्यावेच असे पहिले आणि शेवटचे अनुभव मी त्या दिवसात घेतले. सौरभ सोबत रात्री भुताच्या गोष्टी सांगत, ऐकत माळावर भटकणं, थिनले सोबत हातात हात घेऊन कोऱ्या अंधारात पायाखाली जमीन चाचपडत टेकड्या चढणं, आणि एक शब्दही न बोलता चंद्रकोर पाहत टॉपवर जाऊन झोपून राहणं। ही मुलगी तिबेटीयन आहे, तिची आणि माझी 2 वर्षात नुसती नावापुरता ओळख, तिची भाषा वेगळी, बोलण्याचा लहेजा वेगळा पण त्या हातातल्या हातांचे स्पर्श मला स्पष्ट ओळख देत होते.
आम्ही ठरवताना 3 माहितीपट बनवण्याचे ठरवले होते. बाजार, खाद्यसंस्कृती आणि पोटापाण्याचा व्यवसाय. नंतर तिन्हीचा मिळून एकच माहितीपट तयार झाला ही गोष्ट अलाहिदा. बाजारात गेलो होतो, मी ग्रुप सोडून एकटीच निघाले, त्या अस्ताव्यस्त गल्ल्या खुणावत होत्या मला, कोपर्या कोपऱ्यातून खुणावणाऱ्या असंख्य कथा सारे माझ्या वहीत टिपून घेण्याचा वेडा अट्टाहास चालू होता माझा. मला पाहून मशिदींची दारं बंद करणारे मुस्लिम बांधव, आमचा फोटो घ्या म्हणणारी शिवाजीच्या पुतळ्याखालची टवाळ पोरं, रिकाम्या दवाखान्यातून बरोबर नेम लावत पिचकाऱ्या मारणारे डॉक्टर आणि पेशन्ट नसल्याने मुलीच्या पायाच्या जखमेवर ड्रेसिंग करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ. त्याबरोबर रंगीबेरंगी वस्तू विकायला घेऊन बसणारे होतेच, बैलांच्या विविध झुली, त्यांचे सजावटीचे साहित्य यालाही भाव होताच, तिथेच एका ठेल्यावर तिथला लोकल पदार्थ खाल्ला, मुगाच्या डाळीच्या भजी, खिचडी आणि त्यावरून भरपूर ताकाची कढी. घरी आल्यावर मी कित्ती प्रयत्न केले तसं बनवायचे.. नाही जमलं. तिथेच माझं छोटसं अपहरण सुद्धा झालं. काही युवकांनी एकटीला हेरून गाडीवर बसवली आणि ओसाड जागी नेलं. त्यांना वाटले होते की मी त्यांच्या जमिनी मोजमाप करण्यासाठी शहरातून आले आहे. खरं काय समजल्यावर दुःख व्यक्त करून माफी मागितली आणि परत आणून सोडले. त्यानंतर मी माझ्या रटाळ ग्रूप सोबतच फिरले.
पाऊस कमी असला तरी हिंगोली हिरवी साद घालत होतं. शेती पूर्णतः पावसावर अवलंबून त्यामुळे पशुपालन हाच काय तो गावकऱ्यांचा आधार. इथे भात पिकत नाही तरी त्यांच्या रोजच्या आहारात भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तूर डाळीचं उत्पादन घेतलं जातं तसंच ज्वारीचा एक प्रकार 'टाकळी' आणि त्यासोबत सोयाबीन लावला जातो. एकाच शेतात सगळी पिकं एकत्रच घेतली जातात. पिकं तयार व्हायचा कालावधी वेगळा आणि पावसाची मर्जी त्यामुळे जमीन ओसाड वाया जाऊ नये हा उद्देश. कापसाचे पीक नगदी, भरपूर पैसे कमावून देणारं जरी असलं तरी शेतकरी मात्र पांढर्याफटक कपाशीसारखाच पिंजलेला राहतो. बाजार भाजीपाला व धान्याने समृद्ध असला तरी खरीदाराला महागला आहे. त्यांना मोठ्या दर्जाची बाजारपेठ उपलब्ध व्हायला हवी. भाव जरी चांगला मिळाला तरी मजुरीचा खर्च, माल ने आण करण्याचा वाहतुकीचा खर्च, वाजबाकीच खूप लांबते.
गावातील सरपंच स्त्री आहे, पण तिला नवी साडी नेसून फक्त बहुलीसारखं बसवलं जातं, आमच्या प्रश्नांना उत्तरं पण तिचा धनीच देत होता, तिला बोलुदया म्हंटलं तर तिला बोलताही येत नव्हतं आणि तो बोलुही देत नव्हता.
गावात बौद्ध समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं प्रमाण जास्त आहे, तरी सारे एकजुटीने राहतात. मंडळी कलाकार आहेत, गाण्याची, वाजवण्याची आवडही आहे आणि कलाही आहे, पण श्रोता नाही. गाण्यांना नवे विषय नाहीत, सगळीच गाणी आंबेडकरांभोवती फिरतात.
गावात एकही शौचालय नाही. आम्ही जाणार म्हणून गयानाथच्या घरी शौचालय बांधून घेतले तसेच शाळेत नावाला असलेल्या शौचालयाचे काम पूर्ण केले.
हे लोक 3 वेळेस जेवतात. नाष्टा हा प्रकार फक्त शहरी पाहुणे आले तरंच. शेतावर जायच्या आधी भातभाजी खाऊन जायचं, दुपारची भाकरी कोरड्यास बांधून न्यायचं आणि सांजवलं की आपापल्या घरात जेऊन गुडूप व्हायचं.
पण आताशा गाव रिता रिता वाटू लागला. ज्यांच्या डोळ्यांत स्वप्न फुलली ते शहराकडे पळाले. शिकण्यासाठी, जगण्यासाठी आपापले मार्ग जोखु लागले. अशी अनोखी संस्कृती पाहिलेले हे बोळ, गल्ल्या ओस पडू नये हीच काय ती आता काळजी.