Friday, 3 May 2019

रात्र चढली होती!

तुझं धिंगाणा घालणं, तडफडून रीतं होणं
रात्रभर बरसताना खिडकीची मर्यादा पाळणं
अंधाराची वेळ साधून उगाच हळवं होणं
रात्रीच्या एकांतात एकटं एकटं रडणं

एकट्याचं रडणं की माझ्यासाठी झुरणं?
उत्तररात्र उतरताना चिडून निघून जाणं

ओलीशी उणीव प्रकर्षाने जाणवली आणि प्रीतच जडली
चिडू नकोस रे! एकटा तू पाहिलास आणि रात्रच चढली

Mruga

परसदार

माजघराला बांधून घेतलंय मी स्वतःला,
तू मात्र अतिथी चं आदरातिथ्य कर
आतली सोय उत्तम आहे,
तू व्यवस्था भक्कम कर
माझं शील मी जपून आहे..
तू तुझे बंध मोकळे कर
इथली चूल धगधगत आहे,
तू येणाऱ्याचे स्वागत कर

प्रत्येक पाहुणा पोटभर जेवतोय,
तू औक्षणाचा मान घे
आतल्या खणात आनंद नांदतोय,
पुढ्यात तुझ्या रांगोळी रुळू दे
इथला जन्म सार्थकी लागतोय..
ते तुटलं तोरण तेवढं बांधून घे

यावं वाटलं आत कधी तुला,
अंधारात काही दिसणार नाही
निखळूनच जाईल तो दरवाजा,
आपल्यात काही मग उरणार नाही

Mruga

सवत

माझी आवड माजघरात.. तुझ्या तृप्तीसाठी झटत असते
एका एका पदार्थातून तुझीच वाट पाहत असते

तुझं घर सांभाळताना मी पुरती गंधाळत असते
तुझ्या कवितांचे सोहळे मात्र दुरूनच पाहत असते

शब्दमोह नाही का मला? माझ्याच नशिबावर हसत असते
अवघडल्या रसिकतेचं माझ्या खोटं सांत्वन करत असते

तुझा मूक आक्रोश किती झलील करतो मला
एका एका तुझ्याच कवितेहून लपवून ठेऊ वाटतं तुला

कसलं कौतुक करू मी? माझ्या अपयशाचं?
एका एका शब्दात तुझ्या सवत माझी दिसत असते

Mruga

प्रतिउत्तर

चांगलंच आठवतंय की..
चांगलेच आठवतायत माझे निरागस प्रश्न
आणि त्यावर हसून दिलेलीस तू बेफिकीर उत्तरं
तुझ्या उत्तरांचा अर्थ लावताना संपलेल्या रात्री
आणि अर्थाचा अनर्थ होताना सरलेलं एवढं आयुष्य

म्हणून म्हणून भीती वाटते मला
त्यादिवशीसारखे पुन्हा डोळे बंद झाले आणि,
आणि प्रेमात पडले तर?
खोल आत लपवून ठेवलेलं तुझं नाव
अचानक बोलून गेले तर?

काय करशील, येशील मग?
मला हवी असलेली खरी उत्तरं देशील?
मला काय हवंय नक्की विचारशील?
तुला न सांगता माझ्या निघून जाण्याचं
कारण समजून घेशील?

 नको, उत्तरं देऊच नकोस,
माझे प्रश्न माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस
वचन देणं जमत नाही नं मग सल्ले देऊ नकोस
बोलावलं जरी मनापासून मी,
 तू समोर येऊ नकोस
नक्को

Mruga

चिऊ काऊची गोष्ट




एक चिऊ असते आणि एक असतो काऊ. चिऊला घर असतं. स्वतःचं. घर म्हणजे काय? चार भिंती? एक छप्पर? की कोंडवडा? साठलेल्या भावनांचा? की कुंपण? प्रकाशापासून, पावसापासून किंवा आनंदापासून लपून राहण्याचं? असो... जेवढे प्रश्न तेवढी उत्तरं. तर तिला घरात कामं असतात. रोजचीच. कोणासाठी करत असते ती कामं? कोण येणार असतं राहायला? कोण असतं पाहायला? आपणच ठरवून घेतलेल्या नियमात ती प्रत्येक पाहुणा मोजून घेत असते. नव्हे, खरंतर तिला वाटलेला योग्य पाहुणाच ती घरी बोलावत असते. तिला मात्र बाहेर जायला आवडत नाही. उंबरठा असतो नं तिच्या घराला. म्हणजे मर्यादा. खिडकीतून जग बघायचं. खिडकी दाखवेल तेवढंच. आपल्यावरच हसायचं नि आपल्यावरच रुसायचं.
काऊ कडे काय असतं? काहीच नाही. पण एकदा ती त्याला घरात घेतेच. पावसाळा संपताना काऊ उडून जातो. जाताना चिऊला एक बाळ देऊन जातो. काळशार गोंडस. चिऊला आता बाहेर पडायलाच लागणार असतं. कर्तव्य निभावायला हवंच. बाळाला खाऊ द्यायला हवंच ना! पण उंबरठा? ती मग काढूनच टाकते तो. आता तिचं घर सताड मोकळं. आता येउदे वारा.. बरसुदे धारा. बळाने सगळं बघायला हवं. अश्रू पाहायला हवेत, रंग निरखायला हवेत. बाळाला दुःख दिसायला हवं. नकार पचवता यायला हवेत. त्याला रडता यायला हवं. मन असल्याची जाणीव व्हायला हवी. परिस्थितीशी दोन हात करता यायला हवेत.
पण पाऊस घरटं उध्वस्त करतो. वाऱ्याने पिल्लू पळवलं असतं. भिंतीतलं घरपण झाडभर विखुरलं असतं. उंबरठा काढून टाकायचा नसतो, तो ओलांडण्यासाठी असतो. येणाऱ्याचं स्वागत करतो.. जाणाऱ्याला निरोप देतो. शेवटी मर्यादाच ती! धाक.
आज चिऊ कबुच्या घरात जाते .. रात्र घालवायला .. एक अजून घर उध्वस्त करायला.
गोष्ट चिऊची नव्हतीच मुळी. काऊची होती.
कळलं का? आज चिऊचा काऊ झालेला असतो!
आणि कबूची चिऊ!

Mruga

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...