Sunday, 15 December 2019

शेवट

तू
आणि मी
किनाऱ्यापासून थोडे दूरच
लाट येते, उसळते, माघार घेते
क्षणात फेसाळते, किती पटकन शांत होते
तू हसतोस, दूर होतोस
मी अधीर, मन बधिर, चरफडते
समुद्र उधाणला असतो माझ्या मनात
हिरमुसते, लटकंच रुसते
तू जाणवतोस मग हातात, शांत होते, क्षणात
तुझे इरादे मग मनगटावर उमटलेली बोटंच स्पष्ट करतात
तुला नजर द्यायची काय बिशाद? माझे डोळे इथे हरतात
काय तडफ असते ती! मी अधीन व्हायलाच हवं!
मोहरते.. अगदी चूरर होते
तू निर्लज्ज, रंगत राहतोस
दात रुतवून हसत पाहतोस
का दूर केलं मी तुला? अचानक?
एक अर्धासा श्वास, आणि पूर्ण निःश्वास
आता प्रश्न दिसतो तुझ्या डोळ्यात
आणि उत्तर खाली पडलेल्या माझ्या नजरेत
तुझं तू शोधायचं, एकट्याने मिळवायचं

बाजूच्या स्मशानात विझू घातलेली बेवारस चिता
दुराव्याच्याच आधाराला बांधून ठेवलेली एकटीच आशा
नक्की काय विझणार आहे? एवढ्यात?
संपूर्ण उध्वस्त होऊन तुझ्या छातीवर रडत राहायचंय..
हे असंच.. कायम
आता का तुझे हात मिठीत घेत नाहीत?
पाठीवरून सुद्धा फिरत नाहीत
आणि तेवढ्यात ती येते, न बोलावता, लाट
तीच विलग करते.. तीच उत्तर देते.. संपवते.
चिता विझत नाही.. विझवली जाते!
ओहोटी च्या वेळी त्या एकट्या उर्मिने इतकं दूर का यावं?
कशासाठी?

Mruga
15.12.19

Sunday, 10 November 2019

केळवा फेस्ट

समर्पण जमायला हवं. स्वतःला पूर्णपणे समोरच्या  च्या स्वाधीन करता यायला हवं. तरच आपल्या नक्की काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून समजतं.
रात्रीचा 1 वाजला होता आणि मी वाळूत लोळत होते. आणि समोर पसरलेल्या त्या रसिक समुद्राने माझ्याकडे माझी रात्र मागितली! होतं असं की, आकाशात चंद्र होता. एकटाच. एकही चांदणी नाही. त्याला आकाश कमी पडत होतं की काय तर त्याने समुद्रावर हक्क गाजवायला सुरुवात केली. खारट काळपट तो समुद्र, तसलीच ती माती आणि त्याच्या मळलेल्या लाटा. पण प्रत्येक लाटेच्या घडीवरून चांदीच्या लडी गडगडत होत्या. चक्क चमचमत होता समुद्र. मग म्हंटलं घे.. माझ्या आयुष्याचा जेवढा भाग मागशील, जितका वेळ मागशील तो देऊन टाकीन मी तुला. माझा हवा तेवढा वापर करून घे. मात्र जे काही करशील, अगदी विचारपूर्वक.. माझ्या मनातला तुझ्याबद्दल चा आदर आणि तुझ्यावरच्या विश्वासाला बिल्कुल तडा जाऊ देऊ नकोस.
मग त्याने त्याची ओळख सांगितली... जेवढं सौन्दर्य आहे जगात, ते सगळं मला माझ्या लक्ष लक्ष हातांनी लपेटून टाकायला आवडतं. तेवढ्याच लाख मोलाच्या शंख शिंपल्यांची उधळणही करतो मी, जेव्हा तुझ्यासारखी कुणी माझ्याकडे आसक्तीने पाहत आळसावत पडली असेल, तिच्यावर. माझ्या चंदेरी लाटा तुला बोलवायला कमी पडू लागल्या की मी गाज देत बसतो.. साद घालत बसतो रात्रभर, तुझ्या आळशी स्वभावाचा हेवा करत. सगळं नव्याने परत सुरू करूया नं. ओळख नवी, मैत्री नवी, नातं नवं. एक अजून चान्स देशील मला? यावेळी मी काहीच विस्कटू देणार नाही. शब्द देतोय. आणि एक रात्र मागतोय. तुझी आजची रात्र देशील मला?
माझ्या निर्विकार चेहेऱ्यावर अचानक हसू उमटलं आणि माझ्या नकळत माझा होकार मी त्याला सांगून टाकला. आता ओळख द्यायची वेळ माझी होती. इथेच तर सगळं चुकतं. आश्वासन द्यायचं म्हंटलं की मी घाबरते. अगदी फक्त मैत्री च सुद्धा बंधन नको असतं मला. असे भसाभस विचार येऊ लागले आणि इतके आतुरलेले डोळे झटक्यात कोरडे पडले. माझी स्वतःची ओळख द्यायला शब्द संपले होते आणि मी कमालीची निराश झाले. याच अवस्थेत किती वेळ गेला कोण जाणे, बाजूला बसलेल्या सुस्मिताने विचारलं आता त्सुनामी आली तर काय करायचं? आणि मी तेवढ्याच अचानकपणे उत्तर देऊन टाकलं की मस्तपैकी मरायचं..! बस्स! ओळख सापडली होती मला. रात्र केव्हाच त्याची झाली होती. तो परत एकदा जिंकला होता. आणि मी त्या थंडगार मऊ ओल्या वाळूवर पडून त्याच्या जिंकण्याचं कौतुक करत होते.
त्याच्या आर्जवांचेच सोहळे असतात. ते जन्मभर जगायचे..

सर्वस्वी समुद्राची
Mruga

Thursday, 26 September 2019

राजमाची

3 दिवस घरापासून लांब राहायचं! रात्री सुद्धा मला माझा एकटेपणा मिळणार नव्हता. मोबाईल ला नेटवर्क नसणार. या अगदी शुल्लक गोष्टी आहेत तरीही माझ्यासाठी या भयंकर समस्या होत्या. अगदी निघायच्या क्षणापर्यंत माझी घालमेल सुरू होती.
माणिकगड च्या वेळीसारखंच इथेही प्लॅटफॉर्म वर झोपायचं होतं. पण यावेळी मनाची तयारी होती. लोणावळा स्टेशन ला उतरल्याबरोबर थंड वाऱ्याने अर्धा ताण घालवला. जागोजागी अंगाचं मुटकुळे करून झोपलेली माणसं, बसायच्या बाकावर तरवाटलेल्या लाल डोळ्यातील जाग आणि त्यांच्या नजरा, आणि प्लॅटफॉर्म वरचा उजेड.. झोप लागणं शक्यच नव्हतं. गाड्या येत होत्या.. घाट संपल्यावर गरज नसल्यामुळे आपापली इंजिन काढून मागे सोडून पुढे जात होत्या. ओझं कुणाला हवं असतं? आपणही सोडतोच की गरज नसलेली माणसं मागे..दुनिया आपली वाटू लागली की आईचा पदर सोडतो.. हिम्मत अली की घर सोडतो ..सृष्टीचा नियम आहे तो. तो पाळायलाच हवा. दुसऱ्या दिवशी उठून माचीची वाट चालू लागलो. पहिलाच ओढा लागला तो उगम होता..उल्हास नदीचा. आणि त्यात म्हशी बसल्या होत्या. हेच पाणी भाईंदर खाडीत येतं आणि रोज सकाळी सूर्य उगवताना त्या पाण्याचं किती कौतुक करू आणि किती नको असं होतं मला. उल्हास व्हॅलीतून काय काय पचवत येते ती कोण जाणे. पण तरी चमचमत असते समुद्राला मिळेपर्यंत. ती सगळं लपवते आणि समुद्राला मिळाली की तो सगळं फेकून देतो किनाऱ्यावर. रुखवतात जपून नेलेलं अप्रूप,नंतर त्याचं काय होत? एक दिवसाचा सोहळा आणि एक दिवसाचं कौतुक! आई काकीच्या माहेरची एकतरी वस्तू मागा त्यांच्याकडे, माळवरच्या पेटीत गंजुन गेली असेल. ती त्या घराला आपलं मानते.. पण ते घर तिचं होतं का?
इथल्या माणसांनी मात्र मला आपलंसं केलं.. मी कधी मिसळून गेले मला सुद्धा आठवत नाही. शैलेश दादाच्या घरी राहिलो होतो आम्ही. ओसऱ्यांचं घर. चार भिंतींची खोली संपुर्ण घरात कुठे नाही. कोपऱ्यात चूल. शेणाने सारवलेला ओटा. निखार्यावर पापड भाजायला .. भाकरी थपताना पाहायला अशी निमित्त शोधून मी चुलीजवळ शेकत बसायचे. वरून पाणी लावलेल्या भाकरीचा वास घेतला की भूक सहन होत नव्हती. सोलार वर चालणारं वीस पंचवीस घराचं गाव पण गावकरी मात्र हौशी. त्यांचं भजनी मंडळ आहे. गावात मोजून बारा मुलं.. पूर्ण डोंगर उतरून पेटी मृदुन्ग घेऊन भजनं करायला जातात सगळेच. आम्ही आलोय म्हणून मैफिल बसली. आणि मग मात्र मला गड आवडू लागला. अंधार होता, संगीत होतं, हसून हसवणारी माणसं होती, अजून काय हवं? आपण एखादी ओळ गुणगुणतो आणि सगळेच्या सगळे गाणी म्हणू लागतात असा ग्रुप असेल तर उगाच भीत होते मी. मोकळ्या मनाने गाणी बोललो त्या रात्री आभाळ भरून आलं होतं, आणि ज्या रात्री मन भरून आलं होतं ती रात्र निरभ्र होती. तारे उगवले होते. अंधार कोरडा होता. रात्र परकी वाटत होती आणि मला ते परकेपण आवडू लागलं होतं. एक दिवस मनरंजन साठी आणि एक दिवस श्रीवर्धन साठी. वेळ जास्त असल्यामुळे सगळं पाहत अनुभवत होतो, केसात फुलं माळणं ही स्त्रीसुलभ इच्छा असते असं म्हणतात पण मला ती आजपर्यंत आयुष्यात कधी झाली नव्हती. इथे मी जागोजाग उगवलेली सोनकी आणि तेरड्याची फ़ुलं केसातून खोवत होते. पडू नये, वाऱ्याने उडू नये याची काळजी घेत होते. कोपर्या कोपऱ्यातून ओघळणारे थंड पाण्याचे झरे, पावसाच्या शिडकाव्याने ओलं झालेलं गवत, पडलेल्या झाडांवरून उलट्या छत्रीसारखं उगवलेली मश्रूम, फुलांच्या पाकळीतून जपून ठेवलेलं थेंब भर पाणी आणि परतताना विदिशाला सारखी गोड आवाजात लपून हाक मारणारा पक्षी. एकंदर सौन्दर्याची रेलचेल.
मला शब्दात पकडणं तसं पाहिलं तत् कठीणच त्यामुळे मी काही सांगताना स्पष्ट नाही म्हणणारा विरळाच, पण तेजुताई ठाम नाही म्हणाली. मी कशी आहे हे मलाच समजावून सांगताना, ते सुद्धा एक दिवसाच्या सहवासात, मी पाहतच राहिले तिच्याकडे! अंधारात सुद्धा माझ्या चेहेऱ्यावरचे सूक्ष्म बदल गांधी काकांना दिसत होते. म्हणजे मी पारदर्शक आहे तर! आपल्या मनात काय चाललंय हे कुणाला कळू नये असं आपल्याला वाटत असतं न, आणि आपल्या परवानगीशिवाय कुणी आपल्याला जाणून घेऊ इच्छितो तेव्हा आपण शांत राहू शकत नाही. पण ही पॉवर च नव्हती माझ्याकडे, खूप असहाय वाटत होतं.
दुनिया आपल्यापेक्षा फार वेगळी असते, दुनियेला आपलंसं करावं की आपण तिच्यात रममाण व्हावं? तिचं कौतुक केलं तर आपल्या मीपणाला अर्थ उरत नाही. आणि आपलं वेगळेपण जपलं तर?
असो vac सोबतचे ट्रेक्स नेहमीच लक्षात राहणारे असतात. लक्षात राहावेत. मनात राहावेत. जगून घ्यावेत.

Friday, 3 May 2019

रात्र चढली होती!

तुझं धिंगाणा घालणं, तडफडून रीतं होणं
रात्रभर बरसताना खिडकीची मर्यादा पाळणं
अंधाराची वेळ साधून उगाच हळवं होणं
रात्रीच्या एकांतात एकटं एकटं रडणं

एकट्याचं रडणं की माझ्यासाठी झुरणं?
उत्तररात्र उतरताना चिडून निघून जाणं

ओलीशी उणीव प्रकर्षाने जाणवली आणि प्रीतच जडली
चिडू नकोस रे! एकटा तू पाहिलास आणि रात्रच चढली

Mruga

परसदार

माजघराला बांधून घेतलंय मी स्वतःला,
तू मात्र अतिथी चं आदरातिथ्य कर
आतली सोय उत्तम आहे,
तू व्यवस्था भक्कम कर
माझं शील मी जपून आहे..
तू तुझे बंध मोकळे कर
इथली चूल धगधगत आहे,
तू येणाऱ्याचे स्वागत कर

प्रत्येक पाहुणा पोटभर जेवतोय,
तू औक्षणाचा मान घे
आतल्या खणात आनंद नांदतोय,
पुढ्यात तुझ्या रांगोळी रुळू दे
इथला जन्म सार्थकी लागतोय..
ते तुटलं तोरण तेवढं बांधून घे

यावं वाटलं आत कधी तुला,
अंधारात काही दिसणार नाही
निखळूनच जाईल तो दरवाजा,
आपल्यात काही मग उरणार नाही

Mruga

सवत

माझी आवड माजघरात.. तुझ्या तृप्तीसाठी झटत असते
एका एका पदार्थातून तुझीच वाट पाहत असते

तुझं घर सांभाळताना मी पुरती गंधाळत असते
तुझ्या कवितांचे सोहळे मात्र दुरूनच पाहत असते

शब्दमोह नाही का मला? माझ्याच नशिबावर हसत असते
अवघडल्या रसिकतेचं माझ्या खोटं सांत्वन करत असते

तुझा मूक आक्रोश किती झलील करतो मला
एका एका तुझ्याच कवितेहून लपवून ठेऊ वाटतं तुला

कसलं कौतुक करू मी? माझ्या अपयशाचं?
एका एका शब्दात तुझ्या सवत माझी दिसत असते

Mruga

प्रतिउत्तर

चांगलंच आठवतंय की..
चांगलेच आठवतायत माझे निरागस प्रश्न
आणि त्यावर हसून दिलेलीस तू बेफिकीर उत्तरं
तुझ्या उत्तरांचा अर्थ लावताना संपलेल्या रात्री
आणि अर्थाचा अनर्थ होताना सरलेलं एवढं आयुष्य

म्हणून म्हणून भीती वाटते मला
त्यादिवशीसारखे पुन्हा डोळे बंद झाले आणि,
आणि प्रेमात पडले तर?
खोल आत लपवून ठेवलेलं तुझं नाव
अचानक बोलून गेले तर?

काय करशील, येशील मग?
मला हवी असलेली खरी उत्तरं देशील?
मला काय हवंय नक्की विचारशील?
तुला न सांगता माझ्या निघून जाण्याचं
कारण समजून घेशील?

 नको, उत्तरं देऊच नकोस,
माझे प्रश्न माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस
वचन देणं जमत नाही नं मग सल्ले देऊ नकोस
बोलावलं जरी मनापासून मी,
 तू समोर येऊ नकोस
नक्को

Mruga

चिऊ काऊची गोष्ट




एक चिऊ असते आणि एक असतो काऊ. चिऊला घर असतं. स्वतःचं. घर म्हणजे काय? चार भिंती? एक छप्पर? की कोंडवडा? साठलेल्या भावनांचा? की कुंपण? प्रकाशापासून, पावसापासून किंवा आनंदापासून लपून राहण्याचं? असो... जेवढे प्रश्न तेवढी उत्तरं. तर तिला घरात कामं असतात. रोजचीच. कोणासाठी करत असते ती कामं? कोण येणार असतं राहायला? कोण असतं पाहायला? आपणच ठरवून घेतलेल्या नियमात ती प्रत्येक पाहुणा मोजून घेत असते. नव्हे, खरंतर तिला वाटलेला योग्य पाहुणाच ती घरी बोलावत असते. तिला मात्र बाहेर जायला आवडत नाही. उंबरठा असतो नं तिच्या घराला. म्हणजे मर्यादा. खिडकीतून जग बघायचं. खिडकी दाखवेल तेवढंच. आपल्यावरच हसायचं नि आपल्यावरच रुसायचं.
काऊ कडे काय असतं? काहीच नाही. पण एकदा ती त्याला घरात घेतेच. पावसाळा संपताना काऊ उडून जातो. जाताना चिऊला एक बाळ देऊन जातो. काळशार गोंडस. चिऊला आता बाहेर पडायलाच लागणार असतं. कर्तव्य निभावायला हवंच. बाळाला खाऊ द्यायला हवंच ना! पण उंबरठा? ती मग काढूनच टाकते तो. आता तिचं घर सताड मोकळं. आता येउदे वारा.. बरसुदे धारा. बळाने सगळं बघायला हवं. अश्रू पाहायला हवेत, रंग निरखायला हवेत. बाळाला दुःख दिसायला हवं. नकार पचवता यायला हवेत. त्याला रडता यायला हवं. मन असल्याची जाणीव व्हायला हवी. परिस्थितीशी दोन हात करता यायला हवेत.
पण पाऊस घरटं उध्वस्त करतो. वाऱ्याने पिल्लू पळवलं असतं. भिंतीतलं घरपण झाडभर विखुरलं असतं. उंबरठा काढून टाकायचा नसतो, तो ओलांडण्यासाठी असतो. येणाऱ्याचं स्वागत करतो.. जाणाऱ्याला निरोप देतो. शेवटी मर्यादाच ती! धाक.
आज चिऊ कबुच्या घरात जाते .. रात्र घालवायला .. एक अजून घर उध्वस्त करायला.
गोष्ट चिऊची नव्हतीच मुळी. काऊची होती.
कळलं का? आज चिऊचा काऊ झालेला असतो!
आणि कबूची चिऊ!

Mruga

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...