Monday, 10 December 2018

तू खूप भारी आहेस! हे मला स्वतःकडे पाहिल्यावर कळतं. किनाऱ्यावर उभी आहे मी, जिथे वासना विरक्तीशी वाद घालत असते. आशा प्रयत्न करून माघारी फिरत असते. एक ओली उर्मी माती खेचत असते, आपल्या सोबत खूप आत. समुद्राचे सारे दुष्ट विचार लाटा बाहेर आणत असतात, किनाऱ्यावर मोकळ्या करायला आणि तिथे आहे मी! खूप गोंधळ आहे इथे! अव्यक्त इच्छांचा कोलाहल आहे आणि तू उगवतोयस! जगाला दिशा दाखवतोयस! माझं मन नेहमी बुद्धीच्या स्वाधीन असतं, आज त्याच्यावर वर्चस्व गाजवतोयस तू!
 माझ्यासाठी तू कोण आहे सांगू? एक स्वप्न! जागेपणी रेखलेलं! तुझ्यासारखं व्हायचंय मला! एकटं राहायचंय. फक्त नजरेने ठाव घ्यायचाय अख्ख्या  जगाचा. हे पाणी बघ कसं चमचमतं. तुझ्यासाठी आतुरतं. समुद्राला कणाकणाने कोरडं करत तुझ्या जवळ उडून  येतं.
 इतके रंग आणतोस रोज कुठून तरी... आकाश उधळायला. तसं मला आयुष्य उधळायचय माझं, माझ्या लोकांसाठी. त्यांच्या खुषीसाठी, त्यांच्या गरजांसाठी आणि हव्यासासाठी. पण ते सुंदर रंग मिळवणं काही मला जमत नाही. तुटल्या भावना शब्दांत सांधण साधत नाही. कोरे रंग माझ्याच घरातले स्पष्ट दिसतात रे मला.. ते नीट झाकणं जमतंय, पण रिकामीपणातलं सौंदर्य जगासमोर मांडायला मन धजत नाही. माझं फार प्रेम आहे माझ्या माणसांवर, पण त्यांना आहेत तसं स्वीकारणं काही जमत नाही.
तू हव्यास आहेस की विरक्ती मला माहिती नाही पण तुझं जगापासून अलिप्त असणं मला मान्य नाही. नाही तर काय... तसाच आहेस तू! कुणाला जवळ येऊ द्यायचं नाही पण तू मात्र सतत डोकावतोस, आमच्या आयुष्यात. तुझी गरज तू दाखवून देतोस ...किंवा निर्माण करतोस. जळते मग मी. तुझ्यावर. ज्या दिवशी तुझ्या अस्तित्वाच्या दोऱ्या माझ्या हातात असतील ती जीत असेल माझी. म्हणून राग येतो तुझा.. तरी आवडतोस तू. कदाचित.

Thursday, 15 March 2018

अर्धी ओंजळ

कुरळ्या केसांना कानामागे सारताना
बेमालूमश्या अश्रूला नखावर झेलताना
पडलेल्या तिच्या नजरेला काहीसं समजवताना
झुकल्या हनुवटीशी हळूच बोलताना
ती आयुष्याचा अर्थ सांगत होती
तीच अर्धी ओंजळ तिची माफी मागत होती

घामेजले स्पर्श काही समजावत होते
मोजकेच शब्द तीस सावरू पाहत होते
ओघळल्या अश्रूची क्षमा मागत होते
स्वतःच्या खंबीर नकाराला दुबळा आधार देत होते
अधिर ती बोटं पुन्हा पुन्हा काही विचारत होती
ती अर्धी ओंजळ फक्त प्रश्नांनी भरली होती

उत्तरात नकार नव्हता, नकारच उत्तर होतं
जबाबदारी नको असल्याचं सत्य सांगत होतं
तिच्या अस्फुटश्या विचारांची काळजी करत होतं
रुसलेल्या तिच्या नजरेत समाधान शोधत होतं
ती गोंधळल्या मनाला रीतं करत होती
त्याची अर्धीच ओंजळ तिच्या गालाची समजूत काढत होती

Mruga vartak

Wednesday, 7 March 2018

थोडक्यात इतकंच सांगायचंय..स्वतःसाठी जगायला शिक!

रडू नकोस तू,आता त्यांना जाऊन रडंव
पडू नकोस मागे,तुझं व्यक्तिमत्त्व घडव
प्रेमाचं कोंदण रिकामी आहे? त्याला विचारांनी जडव
गरजा खोट्या नाहीत गं तुझ्या,त्यांना सामर्थ्याने मढव
घाबरू नकोस समाजाला,जेव्हा लाज चव्हाट्यावर येईल
इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल

तुझे अधिकार तुला मिळवता यायला हवेत
तुझ्या हक्कांसाठी तुलाच वाद घालायला हवेत
खूप भांडलीस स्वतःशी,आता बोलता यायला हवे
स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून जगता यायला हवे
समजून घे स्वतःलाच जेव्हा राग उफाळून येईल
इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल

तुझे प्रश्न मांडायला तू घाबरू नकोस
तुझ्या शंका विचारायला तू लाजू नकोस
तुझी कथा तुझी व्यथा तू लपवून ठेऊ नकोस
लोक काय म्हणतील म्हणून बिल्कुल डरू नकोस
उगारलेल्या नजरेवर तुझ्या दुनिया चिडीचूप होईल
इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल

सौंदर्य विकायला काढलंस तर त्यालाही भाव चढेल
पुरुषी अहंकार चाळवलास तर तोच तुझ्याशी नडेल
लायकी दाखवून दिलीस त्यांना तर तुझीच किंमत कळेल
तुझेही नखरे कमी नाहीत,म्हणे स्वाभिमान गळून पडेल
बाजार भरवलास दुःखाचा तर अश्रूही विकला जाईल
इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरज बोंबलत येईल

शृंगार कर स्वतःसाठीच..वाटतं ना छान दिसावंसं?
नवरा गडबडीत असेल तरी वाटतच कि आरशात पहावंसं…
कपाळीचं कुंकू पाहून,वाटतं ना डोळ्यांना हसावंसं?
आणि..कधी..सहजच,गलांवरती रुसावंसं?
नाकावरचा लटका राग दाखव जेव्हा तो घरी येईल
इच्छा पुरव स्वतःच्या जेव्हा गरजंच बोंबलत येईल

Monday, 26 February 2018

तिचा हक्काचा दिवस...आणि त्याबद्दल

माणसांना एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या तिला आज स्वतःचीच जीभ बांधून ठेवावी लागतेय. ज्ञानाचा अवाढव्य पसारा मराठी माणसाला समजेल अशा भाषेत भाषांतरित करणारी आपली मराठी आज का रडतेय? इतिहासातल्या पाना-पानावरुन सोनेरी अक्षरांत सजलेली, कवीच्या लाडक्या शब्दांतून मूक आक्रोश करणारी आज स्वतःच्या अब्रूची लक्तरे स्वतःच्या डोळ्यांनी पाहतेय...मुंबईचा जीव असणारी पश्चिम रेल्वे सुद्धा आज मराठी वाक्यांसाठी इंटरनेट चा आधार घेतेय? दक्षिण मुंबईतील मराठी वातावरणात शिक्षण देणाऱ्या शाळा, त्यांना मराठी हा विषयच नकोसा झालाय? कोणालाच मराठी विषयी कोणताही निर्णय घ्यायचं काहीही स्वातंत्र्य नाही..तो आपण घ्यायचा , आपणच ठरवायचं, आणि त्यासाठी ठोस पावलं आपणच उचलायची.
आणि मराठी माणूस प्रयत्न करतोय.. त्याची भाषा , त्याची गोष्ट आज महाराष्ट्रातील अनेक लोकांपर्यंय पोहोचवण्याचं काम तो वेगवेगळ्या माध्यमांतून करतोय. विविध बोलीभाषांतील कविसम्मेलने, साहित्य परिषदांतून आज नवे चेहरे दिसू लागलेत त्याच प्रकारे मराठी सिनेमा सुद्धा सध्याचा काळात बरीच प्रगती करतोय. वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टी, विविध संस्कृती, आणि निरनिराळ्या प्रांतातील मराठीचा इतिहास जगपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. गोष्ट अभिमानाची नक्कीच आहे परंतु वसा पुढे चालू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मराठीवर आपण प्रेम केलं तर जग प्रेमात पडेल इतकी ताकद, इतकं भाषासौंदर्य आपल्या भाषेकडे नक्कीच आहे. आदर स्वतःचा करा, न्याय मराठीला मिळेल.
मराठीच्या वेदना सहन आपणच करायला हव्यात, गाथा तिच्या यशाच्या आपणच स्मरायला हव्यात
 गौरव तिच्या गुणांचे गड कोट  गात आहेत, कथा तिच्या अनुभवांच्या आपणच लिहायला हव्यात
भाषाप्रभूंच्या दिमाखात शब्दांचे फासे फेकायला हवेत, आठव तिच्या स्वाभिमानाचे आपण गायला हवेत
 उदंड तिच्या भविष्याचे साक्षीदार तुम्हीच आहात, अभिमानाच्या गोष्टी तिच्या आपणच सांगायला हव्यात
कोणे एके काळी ज्या माजात जगली ती, माज तो मराठीचा आपण जपायला हवा
अमृताच्या गोडव्याने ज्ञानशाला फुलवली तिने, मान त्या अमृताचा आपण ठेवायला हवा

Wednesday, 17 January 2018

अवहेलना



अनोळखी या वाटा, तिथली अनोख्यांची गर्दी
अनोळखी अनोख्यांची, मी एकटीच दर्दी

उपकार चांदण्यांचे साभार परत त्यांना
ही अवहेलना मनाची, का अव्हेरु स्वतःला?

सानिध्य नवोदितांचे वाटे हवेहवेसे
परी प्रेम आपुल्यांचे, आता  झाले नकोसे

सोडुनिया जग सारे, कुठे नवा जन्म घ्यावा
एकट्या स्वभावाचा अंत इथे व्हावा

Saturday, 13 January 2018

बारायण

समाजाच्या अपेक्षांचे इमले कितीही उंच असले तरी त्याच्याही वर भरारी घेण्याची ताकद तिच्या कागदी पक्षांत आहे. कारण त्या पक्षाला तिचा टच आहे. आता ती कोण? तीच, जिला मोठ्यांनी घातलेला गोंधळ निस्तरता येतो. तिला मोठ्यांच्या मोठ्या मोठ्या स्वावनांमधल्या मोठ्या मोठ्या चुका समजतात. तिच्या लाडक्या दादाच्या मनातली त्याच्याच विरुद्ध ची त्याची लढाई समजते आणि तहाचा शुभ्र हात मात्र ती पुढे करते. भोळ्या भाबड्या घरात एक चुणचुणीत पाखरू हवंच, चार लोकांच्या चार बाष्कळ गोष्टींमध्ये एकदाच बोलून साऱ्यांना निरुत्तर करण्याचा सभाधीटपणही तिच्याकडे आहे. कौतुक म्हणजे तिचा गोंधळलेला दादा पण त्याच्या मनात सलणऱ्या गोष्टी तिलाच येऊन सांगतो. तो खूप हळवा आहे. अनू. अनिरुद्ध. त्याच्या मनातल्या वादळांना शांत होण्यासाठी वेळच मिळत नाही इतका बिझी असतो तो. डॉक्टर होणार असतो न, मग आभाळाएवढा अभ्यास आलाच. बारावीतला मुलगा, स्वप्नं पाहू लागलेला, आई बाबांचे पंख पांघरून उडू पाहणारा... अरे, तुझे पंख कुणी छाटले नाहीयेत. त्यांनाही होऊ दे की या जगाशी ओळख. ते सफेद आहेत म्हणून छान नको म्हणुस.. तुझेही रंग दाखव.. पांढऱ्या रंगावर डागही पटकन पडतो, पण म्हणून तुझं मन डागाळू देऊ नकोस. आजच्या मुलाना न विचार करता येतो पण बोलायचं धाडस मात्र नसतं. कसं असणार? द्वेषाशी बगावत करता येते पण आजपर्यंत प्रेमावर कुणी विजय मिळवलेला तू ऐकलायस का? प्रेमाचाच विजय नेहमी होतो, ते कुणाला जिंकू देत नाही. आई बाबांचं एवढं प्रेम, ऐपत नसताना काढलेलं लोन आणि त्यांच्याच डोळ्यांत चमकणारी आंधळी स्वप्न.. त्यांना डोळस करण्यासाठी अनूला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायलाच हवं ना!

अन्याला डॉक्टर होता येत नाहीये, अभियांत्रिकी त्याला शिकायचं नाहीए.. पण त्याला काय करायचेय हेही उमजत नाहीये. तो शोधायचा प्रयत्न करतोय पण स्वतःला शोधत नाहीए तर समाजाला अपेक्षित असलेला अनिरुद्ध तो उघड्या डोळ्यांनी काळ्या अंधारात शोधतोय.. जेव्हा सभोवताली अंधार असेल तेव्हा आपणच प्रकाशमय व्हायचं असतं हे त्याला कळतच नाहीये. दुसऱ्यांच्या चेहेऱ्यावर येणारं हसू पाहण्यासाठी हापापला आहे तो. मित्राची पार्टी, पैसे ह्याचे पण क्षणात चमकून गेलेलं ते फक्त त्याच्यासाठी असलेलं हसू त्याला लाखमोलाच वाटतं. इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची इच्छा काय तर फक्त गोल पोळ्यांची. त्याची आई सुद्धा करते त्याच्या साठी गोल चपात्या.. त्याच्यासाठी सगळं करायचं असतं तिला, त्याला हवं नको सगळं पाहायचं असतं, त्याला गडावर शोधायला जाताना तिची ठेचकळणारी पावलं डोक्यातल्या विचारांच्या वेगाची गोष्ट सांगतात. आईचं उसळतं रडू बाबांच्या मिठीत शांत होताना बाबांचे अश्रू मात्र तिच्या परवानगीशिवाय ओघळत सुद्धा नाहीत. पुरुषांनी रडायचं नसतं हे सांगणारा समाज पुरुषांच्या भावनांना घाबरतो का?

मुलांवर संस्कार करताना तुम्ही त्यांना गप्प बसायला शिकवू नका. त्याचे संस्कार त्याच्या शब्दांतूनच उतरुदेत. एकत्र कुटुंबात वाढलेली मुलं समंजस असतातच, त्यांना जाणीव असते एकमेकांच्या गरजांची.. एकमेकांच्या आधाराची म्हणून अपमान झाल्यानंतर सुद्धा निकालाच्या दिवशी तोंड गोड करावं म्हणून खीर आणून देणारे शेजारी फक्त इथेच पाहायला मिळतात. बाहेरून आलेल्या फुकटच्या पाहुण्यांचा हसऱ्या चेहेऱ्याने केलेलं आदरातिथ्य याच गावात पाहायला मिळतं.

श्रद्धा आंधळीच असते.. मग ती भोंदू बाबावरची असो किंवा आपल्याच जीव लावणाऱ्या शेजाऱ्यांवरची..मग त्याच घरातली छोटी चैतु मदतीला येते..चुकीला क्षमा ही माफी मागूनच मिळते, तोंड लपवून नाही.. हे तीच शिकवते. कोणाला भेटायला जाताना रिक्तहस्ते जाऊ नये हे तिला समजतं. जगाची रीत देवणघेवाणीची आहे हे तिला पक्क समजलं असतं.

तुमच्या मुलांच्या मताचा आदर करायला शिका, तरच ती त्यांच्या स्वप्नांचा आदर करतील. त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना काय हवंय हे पाहण्याची एक दिवस तरी सूट द्या. रविवारचे फक्त तीन तास त्याच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी पुरेसे नाहीयेत. अभ्यास नावाचं जड दप्तर त्याच्या पाठीवर लादताना त्याचं यश हवं तेवढं उंच उड्डाण करू शकलं नाही म्हणून तुमचं हसू मावळू देऊ नका.. तो हे सगळं फक्त तुम्हाला हसताना पाहण्यासाठी करतोय.. तुमच्या चेहेऱ्यावर हसू आणण्यासाठी रडतोय.. तुम्हाला रडायला येऊ नये म्हणून झुरतोय.. आणि तुमचं आतल्या आत झुरणं कधीतरी थांबावं म्हणून कष्ट घेतोय..म्हणूनच कष्ट घेतोय, तुमचा लाडका अनू

तिचं पक्षी बनवणं तिच्या भरारी घेण्याच्या स्वभावाची गोष्ट सांगतं. मी संपूर्ण खीर एकटी खाणार, मी आता कामात आहे मला त्रास देऊ नकोस किंवा चैतु न म्हणता काही तरी आदरार्थी संबोधन वापरूनच हाक मारा असं म्हणताना तिची स्वतः ला ओळखायची कुवत दिसून येते..स्वतःला जस आहे तस स्वीकारण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिसून येतो. चार नातेवाईकांच्या नको असलेल्या चर्चेमध्ये आपलं सूज्ञ मत निर्भीडपणे मांडताना तिची विचार करण्याची शक्ती आणि आत्मविश्वास दिसतो. आपल्या दादाचा प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि तो कोण समजू शकेल हे त्याला सांगताना समोरच्याला समजून घेण्याचा समजूतदारपणा लक्षात येतो. जिने आपल्याला कागदाशी मैत्री करायला शिकवली तिला भेटायला जाताना तिला जमेलस काहीतरी गिफ्ट घेऊन जाण यावरून तिच्यावरचे संस्कार समजतात. तू जे काही करशील त्याला तुझा टच हवा हे सांगणारी ती एक बाल तत्वज्ञ वाटली. खोटं बोलल्याने नाती तुटतात हे समजून त्यांचा राग दूर व्हावा म्हणून त्यांना घरी बोलावते, तिचे आई बाबा अगदीच के तर अनु सुद्धा बऱ्याच गोष्टी तिच्याकडून शिकतो


अनू गोड मुलगा आहे, दुसऱ्यांच्या जास्त विचार करतो. आई बाबा आपल्यासाठी बरंच काही करतात याची जाणीव त्याला आहे. घरची मध्यमवर्गीय परिस्थिती आणि समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा हे पाहून आपल्या कुवतीबाहेरची लढाई लढायचा केविलवाणा प्रयत्न करतोय. विचारी आहे, अभ्यासू आहे फक्त स्वतःला न्याय द्यायला त्याला जमत नाही. नातेवाईकांच्या अपेक्षणमध्ये स्वतःला शोधायचा प्रयत्न करतोय. न जमणाऱ्या अभ्यासक्रमापेक्षा आई बाबांच्या प्रेमाचं ओझं घेऊन दबून गेलाय. मित्रांना टेबल खालून मदत करताना दिसणारी ही आजची पिढी जीव लावणारी आहे. मोठं होत असल्याची जाणीव होताना अजूनही लहान असलेली , दुसऱ्यांना न दुखावता त्यांना बरं वाटेल असं करताना बरीच हळवी होतात. ते वयच तसं असतं, मोठं होत असल्याची जाणीव, आई बाबांची खुशी आणि कुवत नसताना केलेली धडपड, यामुळे स्वतःला काय हवंय हे कित्येकवेळा कळत असताना मिळवू शकत नाहीत. हे त्याच्या वाढीवसाच्या दिवशी चायनीज हवंय सांगताना दिसून येतं. इतिहासाबद्दल बोलताना त्याचे हरखून गेलेले डोळे अभ्यासाच्या वेळी हरवून गेल्यासारखे वाटतात

Friday, 12 January 2018

नकार

ती रात्र सुद्धा मला सतावत होती! स्वप्न पहण्याआधीच हसवत होती. अगदीच काय  माझं मन त्या उगवणाऱ्या सूर्याची वाटही न पाहता काळ्याकुट्ट अंधारात एकटच भराऱ्या घेत होतं. खूप उंच उडी मारली की तेवढ्याच वेगात खाली येतो आपण हे मला माहिती तर होतं पण अक्कल गहाण टाकली होती ना! मूर्ख कुठली. जशी पहाटेची चाहूल लागली मला त्रास होऊ लागला. आयुष्यात पहिल्यांदा मला मीच निवडलेल्या एकटेपणाचा त्रास होत होता. जसा अंधार विरळ होत होता तशी माझी आसक्ती गर्द होत होती. आणि त्या उगवत्या सुर्यनारायणाने माझ्यावर कृपा केली. लागली झोप. तीही सावध. सारखी स्वप्न पडून पडून विस्कटलेली झोप मोडली आणि आश्चर्य म्हणजे मनातलं रात्रीच वादळ चक्क शांत झालं होतं.  गेल्या चार वर्षात इतकी खुश मी केव्हा झाली नसेन..आज होते. सगळं अगदी वेळेवर जुळून आलं होतं. जसं काही आयुष्याच्या दोऱ्या माझ्याच हातात. पण अजून सत्याशी सामना व्हायचा होता न. उतावळा स्वभाव असला की नडतोच! सत्याची वैरीण. कुणी सांगितले न नसते उद्योग करायला. नकार काही इतका कठोर नसतो. मला तर अगदी सौम्य शब्दांत मिळाला. एक वेळी अनेक भावनांचा कल्लोळ काय असतो आज अनुभवला मी. राग, द्वेष, स्वतःची चीड, त्यातच एक मन कुठेतरी भीक मागत होतं. आणि शेवटी अश्रू या सगळ्यावर पाणी फेरून गेले. एक समजलं, स्वतःची गरज कधी दुसर्याकडे भीक मागून पूर्ण करता येत नाही. स्वाभिमान तर अशावेळी कुठे तडमडायला जातो कोण जाणे! असो! हाही एक अनुभव बरंच शिकवून गेला. नकाराचं महात्म्य समजावून गेला. कधीतरी कुठेतरी हाच नकार गरजेचा असतो. माझ्याच घरात परकी होते आज मी. स्वतःला नकोशी झाले होते. तात्विक गुंतागुंत सुटता सुटत नाहीत. तत्व बदलायची नाहीत. जग हट्टी आहे माहिती असतं पण स्वतःचा हट्ट सुद्धा पुरवायचा असतो. जे होईल भल्यासाठी..होऊद्या!

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...