Friday, 12 January 2018

नकार

ती रात्र सुद्धा मला सतावत होती! स्वप्न पहण्याआधीच हसवत होती. अगदीच काय  माझं मन त्या उगवणाऱ्या सूर्याची वाटही न पाहता काळ्याकुट्ट अंधारात एकटच भराऱ्या घेत होतं. खूप उंच उडी मारली की तेवढ्याच वेगात खाली येतो आपण हे मला माहिती तर होतं पण अक्कल गहाण टाकली होती ना! मूर्ख कुठली. जशी पहाटेची चाहूल लागली मला त्रास होऊ लागला. आयुष्यात पहिल्यांदा मला मीच निवडलेल्या एकटेपणाचा त्रास होत होता. जसा अंधार विरळ होत होता तशी माझी आसक्ती गर्द होत होती. आणि त्या उगवत्या सुर्यनारायणाने माझ्यावर कृपा केली. लागली झोप. तीही सावध. सारखी स्वप्न पडून पडून विस्कटलेली झोप मोडली आणि आश्चर्य म्हणजे मनातलं रात्रीच वादळ चक्क शांत झालं होतं.  गेल्या चार वर्षात इतकी खुश मी केव्हा झाली नसेन..आज होते. सगळं अगदी वेळेवर जुळून आलं होतं. जसं काही आयुष्याच्या दोऱ्या माझ्याच हातात. पण अजून सत्याशी सामना व्हायचा होता न. उतावळा स्वभाव असला की नडतोच! सत्याची वैरीण. कुणी सांगितले न नसते उद्योग करायला. नकार काही इतका कठोर नसतो. मला तर अगदी सौम्य शब्दांत मिळाला. एक वेळी अनेक भावनांचा कल्लोळ काय असतो आज अनुभवला मी. राग, द्वेष, स्वतःची चीड, त्यातच एक मन कुठेतरी भीक मागत होतं. आणि शेवटी अश्रू या सगळ्यावर पाणी फेरून गेले. एक समजलं, स्वतःची गरज कधी दुसर्याकडे भीक मागून पूर्ण करता येत नाही. स्वाभिमान तर अशावेळी कुठे तडमडायला जातो कोण जाणे! असो! हाही एक अनुभव बरंच शिकवून गेला. नकाराचं महात्म्य समजावून गेला. कधीतरी कुठेतरी हाच नकार गरजेचा असतो. माझ्याच घरात परकी होते आज मी. स्वतःला नकोशी झाले होते. तात्विक गुंतागुंत सुटता सुटत नाहीत. तत्व बदलायची नाहीत. जग हट्टी आहे माहिती असतं पण स्वतःचा हट्ट सुद्धा पुरवायचा असतो. जे होईल भल्यासाठी..होऊद्या!

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...