'लग्न का करावं?' हा प्रश्न आजच्या पिढीला पडू लागला आहे. आणि त्यात वावगं तरी काय आहे म्हणा! कोणत्याही रुढीला, परंपरेला 'का?' विचारला गेला तर त्यात चूक ती काय? खरंतर लग्नव्यवस्थेची, कुटुंबव्यवस्थेची चिकित्सा करायलाच हवी आपण. त्यातून तिचे चांगले वाईट पैलू आपल्यालाच नव्याने समजतात. कालौघात बदलत गेलेली संस्कृती आणि पडत गेलेले पायंडे किती बरोबर किती चूक हे जाणवतं. परिस्थितीनुरूप झालेले बदल किती स्वीकारार्ह याची उत्तरं आपली आपल्यालाच मिळतात. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी अजून काही करता येऊ शकतं का या कल्पना नव्याने सुचत जातात. खरंतर आपली कुटुंबव्यवस्था आणि विवाहसंस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. पण तिला पूर्णपणे नाकारणे आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल हे नक्की.
आज समाजात लग्न होत नाहीत आणि लग्न करू इच्छित नाहीत अशा अविवाहितांसमोर अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांना ढोबळमानाने 2 भागांत आपण विभागू शकत नाही. लग्न होऊनही एकमेकांशी फार पटत नाही हा विषय आपण तूर्तास बाजूलाच ठेवूया. समाजमान्यतेनुसार लग्नाचं वय जवळ असलेली, सव्वीसची होऊ घातलेली मुलगी म्हणून जेव्हा या गोष्टीचा विचार करते तेव्हा अनेक प्रश्न समोर येतात. त्यातल्या जमतील तेवढ्या विचारांना मांडायचा प्रयत्न मी करते.. 'माझ्या एकांतावर बंधनं येणार नाहीत ना? नव्या घरात नव्या माणसांकडून माझा स्वीकार होईल ना? माझ्या पूर्वायुष्यातील घटनांचा काही परिणाम होईल का? इतकी वर्षे जे माझं म्हणून मिळवलं, मिरवलं ते माझ्यापासून कायमचं दुरावेल का? माझ्याकडून काही अपेक्षा केल्या जातील का? आणि त्या अपेक्षांना मी किती पुरी पडू शकेन? नव्या जबाबदाऱ्या येतीलच पण त्यासाठी मी किती वेळ देऊ शकेन? इतरांचं सोडा, माझ्या जोडीदारकडूनही काही चुका होतील, माणूस आहे चुकतोच, मी मोकळ्या मनाने माफ करू शकेन का? माझ्याकडून चूक होणार नाहीत याची काळजी घेऊ शकेन का? नाती निभावून नेऊ शकेन का?' करियर, आर्थिक स्थैर्य, मुलं जन्माला घालायची म्हंटली तर आजच्या महागाईच्या काळात त्यासाठी लागणारं पुरेसं आर्थिक पाठबळ, हे व असे अनेक प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा मला वाटतं त्या प्रश्नांचा जन्म कुठून झाला हे पाहणं महत्वाचं ठरेल. आपल्या स्वभावाची, न्यूनगंडाची सगळी मुळं आपण ज्या परिस्थितीत वाढलो तिथे आपल्या बाळपणात गुरफटलेली असतात. हल्ली मुलं एकेकटी असतात. एकेकटीच वाढतात. घडतात. घरात स्वतःची खोली, जे जे काही लहान मुलांसाठी घरी येईल त्यावर पहिला हक्क त्याचा, अशाने मुलांना स्वतंत्र राहायची सवय लागते. त्याचे प्रश्न त्याचे स्वतःचे असतात, त्याच्या गरजा स्वतःपुरता मर्यादित असतात. त्याच्या कित्येक प्रश्नांची उत्तरं त्याची तो मिळवू लागतो. अशावेळी घराकडे, आईबाबांकडे त्यांच्या एकमेकांशी वागण्याकडे, पुढे पुढे समाजाकडे, इतर जोडप्यांकडे, काका काकी आणि त्यांच्या मुलांचं एकमेकांशी असलेलं नातं, एकूण समाजव्यवस्था आणि त्यानिमित्ताने कुटुंबव्यवस्था ते बाळ मोठं होताना डोक्यात फिट करत असतं. त्यांना तेवढंच दिसतं जितकं आपण दाखवतो. त्यावर त्यांची मतं आधारलेली असतात. किती घरात नवरा बायको मुलांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात? एकमेकांप्रतिच्या नाजूक भावना, प्रेमाचे हळवे क्षण बहुतेकदा बंद दाराआडच साजरे होतात. भांडणं आणि वाद मात्र आपण मुलांसमोरच घालतो. त्याला प्रेम दिसायला नको का? प्रेम समजायला नको? आर्थिक किंवा अजून कोणत्याही (मोठ्यांच्या) अडचणी किती पालक मुलांसमोर डिस्कस करतात? अडचणी आणि त्याचा सामना कसा करावा याचं बाळकडू त्यांना घरातच मिळायला हवं ना?
आपल्या मनात आपल्या स्वतःबद्दल जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा कोणताही निर्णय घ्यायला मन कचरत नाही. आणि आपण घेतलेला निर्णय निभावून नेण्यासाठी जी मनाची तयारी लागते, जी हिम्मत लागते ती बहुतेकदा आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. सगळ्या गोष्टी ट्रायल बेसिस वर करायची सवय लागल्यासारखे तरुण लग्नाकडेही तेवढ्याच कॅज्युअली पाहू लागले तर नवल वाटायला नको. काही नाती आपल्याला जन्माने मिळतात. काही आपल्याला नव्याने जोडायची असतात. मित्रांची आणि जोडीदाराची निवड आपली आपल्याला करायची असते. त्यात चूक झाली तर जबाबदारी आपल्यालाच घ्यायची असते. त्यामुळे जन्माने मिळालेली नाती जितकी स्वास्थ्यपूर्ण ठेवता येतील तेवढी ठेवावी म्हणजे नवी नातीही आपण सुदृढ करायचा प्रयत्न करतो.
चिंता, अडचणी येतीलच पण त्यासोबत आपल्या माणसांना समजून घेण्याइतका समजूतदारपणा आपल्यात असेल तर लग्नाचा निर्णय घेणं सोपं जातं. आजच्या पिढीसमोरच्या प्रश्नांना समुपदेशन हा एकच पर्याय आहे पण पुढच्या पिढीला ते प्रश्न पडू नयेत याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. असं मला वाटतं. कारण आजच्या आपल्या कुटुंबव्यवस्थेवर आणि विवाहसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे.
- मृगा

No comments:
Post a Comment