Saturday, 11 June 2022

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा गुन्हा आहे. वेश्याव्यवसायाची भारताला पुरातन परंपरा आहे. देवदासी पद्धत पूर्वी भारतात अनेक ठिकाणी रूढ होती. फरक इतकाच की त्यावेळी स्वतः आई बाप मुलींना देवीच्या आणि म्हणजेच गावाच्या स्वाधीन करत. मग तिचे आई वडीलही तेवढेच गुन्हेगार. आणि हो, गुलाम सुद्धा! रुढींचे, परंपरांचे आणि अज्ञानाचे. आजही मुलांसाठीचे निर्णय बऱ्याचदा आई वडील घेताना दिसतात. आणि तो शिरसावंद्य मानून मुलं ऐकतात! आपल्याला गुलामीत राहायची सवय झालीये. स्वतःच्या आयुष्यावर अधिकारच नाहीये आपला. समाजाविरुद्ध बंड करून उठणारे फार कमी लोक असतात. तीळ तीळ तुटतात, भांड भांड भांडतात आणि कधीतरी असेच विरून जातात. चाकोरीतलं आपल्या मनाविरुद्ध जगणारे आपण सर्वच काही प्रमाणात वेश्या आहोत. गुलाम आहोत या समाजाचे. आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य आपल्याला माहितीच नाहीत. पुढे काही वर्षांनी आपण मोठे होतो आणि आपापले निर्णय स्वतः घेऊ लागतो. पण ते कशाच्या आधारावर? तर आपल्यावर झालेल्या संस्कारांच्या आधारावर. आणि तेच संस्कार जे समाजाच्या मान्यतांवर आधारलेले असतात! 

वेश्यांचं काय होतं? कोण मुलगी इतर चार पर्याय सहज उपलब्ध होऊ शकत असताना स्वतःहून शरीरविक्रय करायला तयार होईल? कोणत्या स्त्रीला आवडेल अभिमानाने वेश्याव्यवसाय करायला? कोवळ्या वयात तिची तस्करी होते, तिच्यावर देहविक्रयाची सक्ती केली जाते. परंतु पुढील काळात तिचे पुनर्वसन झाल्यानंतरही ती पुन्हा पुन्हा त्या व्यवसायाकडे का वळते? कारण तिला निर्णय स्वातंत्र्य नसतं. तिने नेमलेली माणसं असतात, जी गिर्हाईकांसोबतच तिची व्यसनंही पुरवतात आणि तिच्यावतीने तिचे सारे निर्णयही परस्पर घेतात. तिच्या पुनर्वसनाच्या आधी तिची व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे. वेश्यांच्या पुनर्वसनासाठी बऱ्याच स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. त्यांचे पुनर्वसन होते, त्यांना काम मिळतं परंतु तिच्या शरीराला, तिच्याकडून मिळणाऱ्या पैशाला चटावलेले हेच पुरुष तिला पुन्हा पुन्हा शरीरविक्रय करण्यास भाग पडतात.

आपलंही काय वेगळं होतं? लहानपणीच्या इच्छा, स्वप्न त्याचं पुढे काय होतं? आपणच आपल्या स्वप्नांवर हसतो नाही का? एखादी गोष्ट आपल्याला हवी वाटते तेव्हा ती का हवी वाटते याचा विचार करायला हवा. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्याचे निर्णय आपले आपण घेता यायला हवेत. फक्त ते निर्णय योग्य असावेत याची जबाबदारी आई बाबांची. आपल्या जवळच्या माणसांना निर्णयसक्षम बनवणं हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे. कायदे करून व सोयी सुविधा उपलब्ध करून समाज प्रबोधन घडत नसतं, त्यासाठी विचार परिवर्तन होणं गरजेचं आहे. ज्ञान मिळवायला हवं, आपल्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याविषयी जागरूक असायला हवं. आपण करत असलेली प्रत्येक कृती स्वैछिकच असायला हवी. 

आज जागतिक वेश्याव्यवसाय जागरूकता दिवस. पण तो फक्त ओळखला जातो. तो ज्या दिवशी साजरा केला जाईल तो सुदि


न.

'लग्न पाहावं करून'

 



'लग्न का करावं?' हा प्रश्न आजच्या पिढीला पडू लागला आहे. आणि त्यात वावगं तरी काय आहे म्हणा! कोणत्याही रुढीला, परंपरेला 'का?' विचारला गेला तर त्यात चूक ती काय? खरंतर लग्नव्यवस्थेची, कुटुंबव्यवस्थेची चिकित्सा करायलाच हवी आपण. त्यातून तिचे चांगले वाईट पैलू आपल्यालाच नव्याने समजतात. कालौघात बदलत गेलेली संस्कृती आणि पडत गेलेले पायंडे किती बरोबर किती चूक हे जाणवतं. परिस्थितीनुरूप झालेले बदल किती स्वीकारार्ह याची उत्तरं आपली आपल्यालाच मिळतात. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी अजून काही करता येऊ शकतं का या कल्पना नव्याने सुचत जातात. खरंतर आपली कुटुंबव्यवस्था आणि विवाहसंस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. पण तिला पूर्णपणे नाकारणे आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल हे नक्की.

आज समाजात लग्न होत नाहीत आणि लग्न करू इच्छित नाहीत अशा अविवाहितांसमोर अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांना ढोबळमानाने 2 भागांत आपण विभागू शकत नाही. लग्न होऊनही एकमेकांशी फार पटत नाही हा विषय आपण तूर्तास बाजूलाच ठेवूया. समाजमान्यतेनुसार लग्नाचं वय जवळ असलेली, सव्वीसची होऊ घातलेली मुलगी म्हणून जेव्हा या गोष्टीचा विचार करते तेव्हा अनेक प्रश्न समोर येतात. त्यातल्या जमतील तेवढ्या विचारांना मांडायचा प्रयत्न मी करते.. 'माझ्या एकांतावर बंधनं येणार नाहीत ना? नव्या घरात नव्या माणसांकडून माझा स्वीकार होईल ना? माझ्या पूर्वायुष्यातील घटनांचा काही परिणाम होईल का? इतकी वर्षे जे माझं म्हणून मिळवलं, मिरवलं ते माझ्यापासून कायमचं दुरावेल का? माझ्याकडून काही अपेक्षा केल्या जातील का? आणि त्या अपेक्षांना मी किती पुरी पडू शकेन? नव्या जबाबदाऱ्या येतीलच पण त्यासाठी मी किती वेळ देऊ शकेन? इतरांचं सोडा, माझ्या जोडीदारकडूनही काही चुका होतील, माणूस आहे चुकतोच, मी मोकळ्या मनाने माफ करू शकेन का? माझ्याकडून चूक होणार नाहीत याची काळजी घेऊ शकेन का? नाती निभावून नेऊ शकेन का?' करियर, आर्थिक स्थैर्य, मुलं जन्माला घालायची म्हंटली तर आजच्या महागाईच्या काळात त्यासाठी लागणारं पुरेसं आर्थिक पाठबळ, हे व असे अनेक प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा मला वाटतं त्या प्रश्नांचा जन्म कुठून झाला हे पाहणं महत्वाचं ठरेल. आपल्या स्वभावाची, न्यूनगंडाची सगळी मुळं आपण ज्या परिस्थितीत वाढलो तिथे आपल्या बाळपणात गुरफटलेली असतात. हल्ली मुलं एकेकटी असतात. एकेकटीच वाढतात. घडतात. घरात स्वतःची खोली, जे जे काही लहान मुलांसाठी घरी येईल त्यावर पहिला हक्क त्याचा, अशाने मुलांना स्वतंत्र राहायची सवय लागते. त्याचे प्रश्न त्याचे स्वतःचे असतात, त्याच्या गरजा स्वतःपुरता मर्यादित असतात. त्याच्या कित्येक प्रश्नांची उत्तरं त्याची तो मिळवू लागतो. अशावेळी घराकडे, आईबाबांकडे त्यांच्या एकमेकांशी वागण्याकडे, पुढे पुढे समाजाकडे, इतर जोडप्यांकडे, काका काकी आणि त्यांच्या मुलांचं एकमेकांशी असलेलं नातं, एकूण समाजव्यवस्था आणि त्यानिमित्ताने कुटुंबव्यवस्था ते बाळ मोठं होताना डोक्यात फिट करत असतं. त्यांना तेवढंच दिसतं जितकं आपण दाखवतो. त्यावर त्यांची मतं आधारलेली असतात. किती घरात नवरा बायको मुलांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात? एकमेकांप्रतिच्या नाजूक भावना, प्रेमाचे हळवे क्षण बहुतेकदा बंद दाराआडच साजरे होतात. भांडणं आणि वाद मात्र आपण मुलांसमोरच घालतो. त्याला प्रेम दिसायला नको का? प्रेम समजायला नको? आर्थिक किंवा अजून कोणत्याही (मोठ्यांच्या) अडचणी किती पालक मुलांसमोर डिस्कस करतात? अडचणी आणि त्याचा सामना कसा करावा याचं बाळकडू त्यांना घरातच मिळायला हवं ना?

आपल्या मनात आपल्या स्वतःबद्दल जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा कोणताही निर्णय घ्यायला मन कचरत नाही. आणि आपण घेतलेला निर्णय निभावून नेण्यासाठी जी मनाची तयारी लागते, जी हिम्मत लागते ती बहुतेकदा आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. सगळ्या गोष्टी ट्रायल बेसिस वर करायची सवय लागल्यासारखे तरुण लग्नाकडेही तेवढ्याच कॅज्युअली पाहू लागले तर नवल वाटायला नको. काही नाती आपल्याला जन्माने मिळतात. काही आपल्याला नव्याने जोडायची असतात. मित्रांची आणि जोडीदाराची निवड आपली आपल्याला करायची असते. त्यात चूक झाली तर जबाबदारी आपल्यालाच घ्यायची असते. त्यामुळे जन्माने मिळालेली नाती जितकी स्वास्थ्यपूर्ण ठेवता येतील तेवढी ठेवावी म्हणजे नवी नातीही आपण सुदृढ करायचा प्रयत्न करतो. 

चिंता, अडचणी येतीलच पण त्यासोबत आपल्या माणसांना समजून घेण्याइतका समजूतदारपणा आपल्यात असेल तर लग्नाचा निर्णय घेणं सोपं जातं. आजच्या पिढीसमोरच्या प्रश्नांना समुपदेशन हा एकच पर्याय आहे पण पुढच्या पिढीला ते प्रश्न पडू नयेत याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. असं मला वाटतं. कारण आजच्या आपल्या कुटुंबव्यवस्थेवर आणि विवाहसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे.


- मृगा

Tuesday, 8 March 2022

कचरा वेचणाऱ्या स्त्रिया आणि महिला दिन

"काम काय सांगू बाई पुरा जलमच कचऱ्यात गेला", गप्पा सांगाव्या तेवढ्या सहज ती बोलून गेली. बसलेल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी खदाखदा हसल्या आणि माझे डोळे पाणावले.

कचरा वेचणाऱ्या महिलांना बोलावून तरुण भारतच्या कार्यालयात महिला दिन आयोजित केला होता. काही बुजत होत्या, काही लाजत होत्या, हसत तर सगळ्याच होत्या. दीड वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन माझ्याहून लहान आई आपली कचराकिर्दीची ओळख सांगत होती. बरं, गोष्ट एवढीच नाही तर त्यांचे अनुभव आणि कार्यालयातील युवतींचे प्रश्न यातही तफावत होती. आमचे प्रश्नच त्यांना समजत नव्हते आणि मला तर त्यांच्या उत्तरांचीच चीड येत होती. 'अंगाव आलाच कोण मरद तं तित्तेच हाणून पडायचा' म्हणणारी चार पोरांची आईस नवरा दारू पिऊन मारतो म्हणून माहेरी येऊन राहिलेली. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचू देत नाही अशी त्यांची सरकारकडे तक्रार होती! दिवसभर वेचून 200 ची कडक नोट मिळवायची असेल तर पहारेकऱ्यांच्या हातावर पन्नासची चिरीमिरी ठेवावी लागते. प्रमाणित स्वछता दूत म्हणून पास मिळवायचा असेल तर 1200 रुपये मोजून महिन्याचा पास मिळतो. तो दर महिन्याला 100 रुपये देऊन रिन्यू करायचा. आणि हा आटापिटा कशासाठी? तर हाताचं घालायचं (ग्लोव्ज) तोंडाला मास्क आणि बुट मिळतात म्हणून. बरं, त्याचा उपयोग किती? तर शून्य! कारण ते घालून काम करताच येत नाही. पण असा मासिक पास ज्या स्त्रीकडे आहे ती वस्तीतली प्रतिष्ठित स्त्री. 

लहानसा विनोद झाला की त्यांचं खळाळतं निखळ हसू पदराच्या ओच्याने नाहीतर ओढणीने झाकण्याची त्यांची धांदल, एखाद्या मुद्द्यावर एकमेकींवरच ताशेरे ओढत घातलेला सावळा गोंधळ, तुला ओळख सांगता येत नाहीतर निदान आडनाव आणि नवऱ्याचं नाव सांग म्हणत धीर देणाऱ्या बायका, 'आमी नगरसेवकाकडे, सेनेच्या हाफिसात मोर्चा घियून गेलो तरी आमाला कचरं येचु दिनात' म्हणणारे निरागस भाव, सगळंच विलक्षण, विलोभनीय. कचराच मागत होत्या त्या पूर्णवेळ, मदत किंवा सहानभूती नाही. शिक्षण घेतल्याने सगळं उत्तम मार्गी लागतं ही ठाम समजूत आणि संस्कारांच्या स चीही ओळख नसलेली ही मक्ख जमात. कुतूहल, उत्सुकता यांचा लवलेशही नाही पण देवनारचं डम्पिंग ग्राउंड का बंद झालं हे सांगितलं तर ठिणग्या उडाव्यात तसा उसळता राग अगदी. राग तरी कुणावर? कशासाठी? ना त्यांना माहिती न मला समजला..

गोवंडी येथे राहणाऱ्या वस्तीतील स्त्रिया देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाचण्यासाठी जातात. परंतु त्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर सरकारने ते बंद केले आणि एका खासगी कंपनीला देवनार विभाग सोपवला. त्यानंतर या विभागात अत्याचार फार, अगदी पंधरा वर्षाची मुलगी नाल्यात फेकून दिली पासून पाच वर्षाचं लेकरू बलात्कार करून पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवलं असं सहज म्हणतात त्या. त्यांना धुण्याभांड्याची काही कामं मिळतात पण फार टिकत नाहीत. गोवंडी भागात गुंड प्रवृत्तीची माणसं फार म्हणून त्यांना दूरच ठेवलं जातं. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणं मुश्किल कारण ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांचा अभाव. आम्हाला काही रोग नाही, कोरोना आम्हाला शिवला नाही.. ताप तर कधीच येत नाही म्हणताना टीबी आणि कॅन्सर सारखे आजार कचऱ्यात काम केल्याने होतात हे त्यांना माहितीच नाही. नवरा दारू पितो, नांदवत नाही म्हणून सर्रास आईच्या घरी येऊन राहतात. पदरात 4-5 लहान मुलं. मुलगी झाली तर तिचं तोंड बघायला पण नवरा फिरकला नाही म्हणणारी फक्त विशीतली असावीशी तरुणी. कचऱ्यातल्याच एखाद्या पाकिटात चिवडा मिळाला तर भुकेला तो खावा इतकं सहज आयुष्य आहे त्यांचं. त्यांना माझं आयुष्य समजत नाही आणि मला त्यांचं आयुष्य पटत नाही इतकाच काय तो आमच्यातला फरक! 

यांच्या व्यथा ऐकताना डोळे दाटून येतात, यांचा भार पृथ्वीला होऊ नयेसं वाटतं.

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...