Friday, 22 May 2020

चकोर

खवळलेल्या समुद्राला कुठे माहिती असतं चंद्राचं प्रेम?
दिसतो फक्त दुरावा.. असते फक्त आशा
समजत नाहीच.. मौनाची भाषा
समुद्र फारच उथळ..बोलघेवडा
आणि चंद्र मनकवडा
हा उधाणतो.. वाळूवर शिंपले उधळतो
मन लावून पृथ्वीची आराधना करतो..
लाख लाख हातांनी तिला वेढू पाहतो
कितीही खुश वाटला, तरी झुरतो
खरंच झुरतो
भरती ओहोटी काही काही नसतं
नुसतेच सगळे मनाचे खेळ
तिचं हिरवं होणं,हसणं, फुलणं
कसला कशाशी मेळ?

चंद्र सारं जाणून असतो
आतल्या आत शमलेली वादळं, आंदोलनं
त्याच्यामुळेच उत्पन्न होणारी लाटांची कंपनं
त्याच्यामुळेच असली तरी त्याच्या साठी नसतात
एक भिंत असते.. न दिसणारी..
न तुटणारी.. मर्यादेची!
पश्चिमेकडे झपाट्याने पावलं उचलतो..
पण? पण मन कुठे मोकळं करता येतं त्याला?
जीवाची कोर कोर करताना,
चकोराचं प्रेम त्याला तरी कुठे दिसतं?
आणि खवळलेल्या समुद्राला कुठे माहिती असतं चंद्राचं प्रेम?
दुरून वर्षाव करणारं, लाटांवर चांदी उतरवणारं
चंद्र एकटा.. फिरत राहतो
पृथ्वीची मनधरणी करतो
काहीही झालं तरी प्रेम उरतंच! ना?

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...