Thursday, 10 September 2020

रिक्त

 रिक्त जाहले पुन्हा तुझीच जीत जाहली

दृष्टी आज सार्थ माझी सृष्टी तुझी पाहिली


कोसळले गगन गहन दगडांतूनी पाझरले

शुभ्र जरी अंतरंग मातींतूनी माखले


आज वाहिले स्वतःस सिद्ध करण्या जरी

पाहुनी तुला पुन्हा उफाणली वेदना उरी


विसरले सारे कशी मतीच गुंग राहिली

रिक्त जाहले पुन्हा तुझीच जीत जाहली


निरंतर समुद्राचीच,

 मृगा


Friday, 22 May 2020

चंदेरी 2

पहाटवारं उसाटताना
मन चौखूर सुसाटताना
तू ये..

उत्तररात्र उतरताना
नक्षत्र निष्प्रभ होताना
पूर्वा रंगात रंगताना
आता तरी ये..

गीत विरून जाताना
पहाट सरून जाताना
तू हातात हात दे..

नुसता गोंधळ होईल
श्वासाची लय चुकेल
नजर खाली झुकेल
तू समजून घे..

काही विचारू नकोस
उत्तर सापडणार नाही
काही मी बोललेच
त्याचा अर्थ लागणार नाही

जोवर नजर सरावत नाही
डोळे परवानगी देत नाहीत
हात सोडू नकोस

उठून निघून जाऊ नकोस
बोलून मोकळा होऊ नकोस
संभ्रम राहूदे..
राहू देशील?

-mruga
29.01.20

चकोर

खवळलेल्या समुद्राला कुठे माहिती असतं चंद्राचं प्रेम?
दिसतो फक्त दुरावा.. असते फक्त आशा
समजत नाहीच.. मौनाची भाषा
समुद्र फारच उथळ..बोलघेवडा
आणि चंद्र मनकवडा
हा उधाणतो.. वाळूवर शिंपले उधळतो
मन लावून पृथ्वीची आराधना करतो..
लाख लाख हातांनी तिला वेढू पाहतो
कितीही खुश वाटला, तरी झुरतो
खरंच झुरतो
भरती ओहोटी काही काही नसतं
नुसतेच सगळे मनाचे खेळ
तिचं हिरवं होणं,हसणं, फुलणं
कसला कशाशी मेळ?

चंद्र सारं जाणून असतो
आतल्या आत शमलेली वादळं, आंदोलनं
त्याच्यामुळेच उत्पन्न होणारी लाटांची कंपनं
त्याच्यामुळेच असली तरी त्याच्या साठी नसतात
एक भिंत असते.. न दिसणारी..
न तुटणारी.. मर्यादेची!
पश्चिमेकडे झपाट्याने पावलं उचलतो..
पण? पण मन कुठे मोकळं करता येतं त्याला?
जीवाची कोर कोर करताना,
चकोराचं प्रेम त्याला तरी कुठे दिसतं?
आणि खवळलेल्या समुद्राला कुठे माहिती असतं चंद्राचं प्रेम?
दुरून वर्षाव करणारं, लाटांवर चांदी उतरवणारं
चंद्र एकटा.. फिरत राहतो
पृथ्वीची मनधरणी करतो
काहीही झालं तरी प्रेम उरतंच! ना?

संभ्रम

संभ्रम तुझ्या प्रभेचा
इतक्यांत असा सरतो
संपतो, सुस्पष्ट जरी
असा आत आत उरतो

का हेच होते सत्य
का भास ही हरवतो
हा चंद्र चांदण्यांना
का आजही फसवतो

किती शीत शस्त्र असले
निश्वास उष्ण होतो
हसतो, क्षणात विरतो
का रोज घायाळ करतो

तो एक स्पर्श साधा
किती खोल वार करतो
हरवला जरी क्षणात
का रोज हाल करतो

Mruga
29.01.20

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...