Tuesday, 8 March 2022

कचरा वेचणाऱ्या स्त्रिया आणि महिला दिन

"काम काय सांगू बाई पुरा जलमच कचऱ्यात गेला", गप्पा सांगाव्या तेवढ्या सहज ती बोलून गेली. बसलेल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी खदाखदा हसल्या आणि माझे डोळे पाणावले.

कचरा वेचणाऱ्या महिलांना बोलावून तरुण भारतच्या कार्यालयात महिला दिन आयोजित केला होता. काही बुजत होत्या, काही लाजत होत्या, हसत तर सगळ्याच होत्या. दीड वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन माझ्याहून लहान आई आपली कचराकिर्दीची ओळख सांगत होती. बरं, गोष्ट एवढीच नाही तर त्यांचे अनुभव आणि कार्यालयातील युवतींचे प्रश्न यातही तफावत होती. आमचे प्रश्नच त्यांना समजत नव्हते आणि मला तर त्यांच्या उत्तरांचीच चीड येत होती. 'अंगाव आलाच कोण मरद तं तित्तेच हाणून पडायचा' म्हणणारी चार पोरांची आईस नवरा दारू पिऊन मारतो म्हणून माहेरी येऊन राहिलेली. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचू देत नाही अशी त्यांची सरकारकडे तक्रार होती! दिवसभर वेचून 200 ची कडक नोट मिळवायची असेल तर पहारेकऱ्यांच्या हातावर पन्नासची चिरीमिरी ठेवावी लागते. प्रमाणित स्वछता दूत म्हणून पास मिळवायचा असेल तर 1200 रुपये मोजून महिन्याचा पास मिळतो. तो दर महिन्याला 100 रुपये देऊन रिन्यू करायचा. आणि हा आटापिटा कशासाठी? तर हाताचं घालायचं (ग्लोव्ज) तोंडाला मास्क आणि बुट मिळतात म्हणून. बरं, त्याचा उपयोग किती? तर शून्य! कारण ते घालून काम करताच येत नाही. पण असा मासिक पास ज्या स्त्रीकडे आहे ती वस्तीतली प्रतिष्ठित स्त्री. 

लहानसा विनोद झाला की त्यांचं खळाळतं निखळ हसू पदराच्या ओच्याने नाहीतर ओढणीने झाकण्याची त्यांची धांदल, एखाद्या मुद्द्यावर एकमेकींवरच ताशेरे ओढत घातलेला सावळा गोंधळ, तुला ओळख सांगता येत नाहीतर निदान आडनाव आणि नवऱ्याचं नाव सांग म्हणत धीर देणाऱ्या बायका, 'आमी नगरसेवकाकडे, सेनेच्या हाफिसात मोर्चा घियून गेलो तरी आमाला कचरं येचु दिनात' म्हणणारे निरागस भाव, सगळंच विलक्षण, विलोभनीय. कचराच मागत होत्या त्या पूर्णवेळ, मदत किंवा सहानभूती नाही. शिक्षण घेतल्याने सगळं उत्तम मार्गी लागतं ही ठाम समजूत आणि संस्कारांच्या स चीही ओळख नसलेली ही मक्ख जमात. कुतूहल, उत्सुकता यांचा लवलेशही नाही पण देवनारचं डम्पिंग ग्राउंड का बंद झालं हे सांगितलं तर ठिणग्या उडाव्यात तसा उसळता राग अगदी. राग तरी कुणावर? कशासाठी? ना त्यांना माहिती न मला समजला..

गोवंडी येथे राहणाऱ्या वस्तीतील स्त्रिया देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाचण्यासाठी जातात. परंतु त्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर सरकारने ते बंद केले आणि एका खासगी कंपनीला देवनार विभाग सोपवला. त्यानंतर या विभागात अत्याचार फार, अगदी पंधरा वर्षाची मुलगी नाल्यात फेकून दिली पासून पाच वर्षाचं लेकरू बलात्कार करून पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवलं असं सहज म्हणतात त्या. त्यांना धुण्याभांड्याची काही कामं मिळतात पण फार टिकत नाहीत. गोवंडी भागात गुंड प्रवृत्तीची माणसं फार म्हणून त्यांना दूरच ठेवलं जातं. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणं मुश्किल कारण ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांचा अभाव. आम्हाला काही रोग नाही, कोरोना आम्हाला शिवला नाही.. ताप तर कधीच येत नाही म्हणताना टीबी आणि कॅन्सर सारखे आजार कचऱ्यात काम केल्याने होतात हे त्यांना माहितीच नाही. नवरा दारू पितो, नांदवत नाही म्हणून सर्रास आईच्या घरी येऊन राहतात. पदरात 4-5 लहान मुलं. मुलगी झाली तर तिचं तोंड बघायला पण नवरा फिरकला नाही म्हणणारी फक्त विशीतली असावीशी तरुणी. कचऱ्यातल्याच एखाद्या पाकिटात चिवडा मिळाला तर भुकेला तो खावा इतकं सहज आयुष्य आहे त्यांचं. त्यांना माझं आयुष्य समजत नाही आणि मला त्यांचं आयुष्य पटत नाही इतकाच काय तो आमच्यातला फरक! 

यांच्या व्यथा ऐकताना डोळे दाटून येतात, यांचा भार पृथ्वीला होऊ नयेसं वाटतं.

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...