Sunday, 10 November 2019

केळवा फेस्ट

समर्पण जमायला हवं. स्वतःला पूर्णपणे समोरच्या  च्या स्वाधीन करता यायला हवं. तरच आपल्या नक्की काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून समजतं.
रात्रीचा 1 वाजला होता आणि मी वाळूत लोळत होते. आणि समोर पसरलेल्या त्या रसिक समुद्राने माझ्याकडे माझी रात्र मागितली! होतं असं की, आकाशात चंद्र होता. एकटाच. एकही चांदणी नाही. त्याला आकाश कमी पडत होतं की काय तर त्याने समुद्रावर हक्क गाजवायला सुरुवात केली. खारट काळपट तो समुद्र, तसलीच ती माती आणि त्याच्या मळलेल्या लाटा. पण प्रत्येक लाटेच्या घडीवरून चांदीच्या लडी गडगडत होत्या. चक्क चमचमत होता समुद्र. मग म्हंटलं घे.. माझ्या आयुष्याचा जेवढा भाग मागशील, जितका वेळ मागशील तो देऊन टाकीन मी तुला. माझा हवा तेवढा वापर करून घे. मात्र जे काही करशील, अगदी विचारपूर्वक.. माझ्या मनातला तुझ्याबद्दल चा आदर आणि तुझ्यावरच्या विश्वासाला बिल्कुल तडा जाऊ देऊ नकोस.
मग त्याने त्याची ओळख सांगितली... जेवढं सौन्दर्य आहे जगात, ते सगळं मला माझ्या लक्ष लक्ष हातांनी लपेटून टाकायला आवडतं. तेवढ्याच लाख मोलाच्या शंख शिंपल्यांची उधळणही करतो मी, जेव्हा तुझ्यासारखी कुणी माझ्याकडे आसक्तीने पाहत आळसावत पडली असेल, तिच्यावर. माझ्या चंदेरी लाटा तुला बोलवायला कमी पडू लागल्या की मी गाज देत बसतो.. साद घालत बसतो रात्रभर, तुझ्या आळशी स्वभावाचा हेवा करत. सगळं नव्याने परत सुरू करूया नं. ओळख नवी, मैत्री नवी, नातं नवं. एक अजून चान्स देशील मला? यावेळी मी काहीच विस्कटू देणार नाही. शब्द देतोय. आणि एक रात्र मागतोय. तुझी आजची रात्र देशील मला?
माझ्या निर्विकार चेहेऱ्यावर अचानक हसू उमटलं आणि माझ्या नकळत माझा होकार मी त्याला सांगून टाकला. आता ओळख द्यायची वेळ माझी होती. इथेच तर सगळं चुकतं. आश्वासन द्यायचं म्हंटलं की मी घाबरते. अगदी फक्त मैत्री च सुद्धा बंधन नको असतं मला. असे भसाभस विचार येऊ लागले आणि इतके आतुरलेले डोळे झटक्यात कोरडे पडले. माझी स्वतःची ओळख द्यायला शब्द संपले होते आणि मी कमालीची निराश झाले. याच अवस्थेत किती वेळ गेला कोण जाणे, बाजूला बसलेल्या सुस्मिताने विचारलं आता त्सुनामी आली तर काय करायचं? आणि मी तेवढ्याच अचानकपणे उत्तर देऊन टाकलं की मस्तपैकी मरायचं..! बस्स! ओळख सापडली होती मला. रात्र केव्हाच त्याची झाली होती. तो परत एकदा जिंकला होता. आणि मी त्या थंडगार मऊ ओल्या वाळूवर पडून त्याच्या जिंकण्याचं कौतुक करत होते.
त्याच्या आर्जवांचेच सोहळे असतात. ते जन्मभर जगायचे..

सर्वस्वी समुद्राची
Mruga

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...