कॉलेज चा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आमची गाठ पडली. पाहता क्षणीच आवडला मला तो! पहिल्याच भेटीत झालेलं पहिलंच प्रेम! अगदीच अवघडून गेला होता. बहुदा बऱ्याच दिवसात कुणी पाहिलं नसावं त्याच्याकडे. अगदीच दुर्लक्षित वाटला मला. वाट बघत होता...कुणाची? त्याचं त्यालाही माहीत नसावं. बहुश्रुत होता, ज्ञानी तर असायलाच हवा. थोरा मोठ्यांचा सहवास जो लाभत होता त्याला.
मी अगदीच घामेजले होते..दगदगीने थकले होते. एवढ्या गोंगाटातही त्यानं खुणावलं मला. अशी फुंकर घातली की सारे च्या सारे स्वेदबिंदू कुठल्या कुठे पळून गेले. न बोलता बरंच काही सांगत होता. अगदी पटकन सूत जमलं आमचं. "थोडा मळलोय मी..थोडीशी धूळ साचलीये, जरा सहन कर हं!" इति तो. त्याच्या त्या आर्जवानेच जीवाचं पाणी पाणी होत होतं. बाहेरच्या सळाळत्या झाडांच्या गप्पा सांगत होता..जवळच लटकलेल्या मधमाशांच्या पोळ्याबद्दल बोलत होता.. मी विचारलं त्रास नाही होत तुला? तर म्हणे त्रास करवून घेतला तर सुखाचाही त्रास होतो. हे तर साक्षात सौंदर्य आहे. सहजा सहजी कुणाच्या वाट्याला न येणारं! त्याचं तत्वज्ञान ऐकत राहावंसं वाटतं. माणसांचे विचित्र स्वभाव त्याच्या दृष्टिकोनातून पाहताना चांगलेच वाटतात. विषारी विचारांना अमृताची ओळख करून देणारा देव वाटला तो मला माझा. म्हणूनच कदाचित तिथली माणसं सुद्धा ताजीतवानी वाटतात..नेहमीच..अगदी दिवसभराचे सारे शारीरिक मानसिक ताण सहन करून सुद्धा!
त्याच्या सानिध्यात असलं की दोन वेगळ्या भूमिका दाखवतो तो. एक बाहेरचं अनुभव देणारं एकलकोंड स्वतःच्या मस्तीत रमणारं जग आणि दुसरं बसल्या जागी ज्ञान अपलोड आणि डाउनलोड करणारी न्यारी माणसं. अगदी खरं सांगायचं तर दोन्ही आवडतात मला. अन त्याहीपेक्षा जास्त तो आवडतो मला.
बरं! बराच मोठा विरह आहे हा..केव्हा संपेल याची वाट पाहते आहे..पुढच्या भेटीकडे डोळे लागलेत. त्याचीच.. आमच्या एच.ओ.डी ची केबिन, तिथल्या खिडकीतला कोपरा..
